विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी ईडी हे शस्त्र वापरलं जातंय - भुजबळ

ईडीचा देशात दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे

Updated: Sep 25, 2019, 12:38 PM IST
विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी ईडी हे शस्त्र वापरलं जातंय - भुजबळ  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : ईडीचा देशात दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. अतिरेक्यांवर जरब बसावी म्हणून हा कायदा जगभर करण्यात आला. आपण तो अधिक कडक केला. भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तेही अतिरेकी गणले जाऊ लागले. ही सुधारणा पी. चिदंबरम यांनी केली. इतर गुन्ह्यात पोलीस तपास करून गुन्हेगार आहे की नाही हे सिद्ध करतात पण

गुन्हा केला की नाही हे त्या गुन्हेगाराने सिद्ध करायचे असा हा विचित्र कायदा आहे असे भुजबळ यांनी म्हटले. विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी ईडी हे शस्त्र म्हणून वापरलं जातं असल्याचा आरोप भुजबळ यांनी केलाय. 

हे कायदे बनवताना आणि वापरताना आपण कायम त्या गादीवर बसलेलो नाही कुणाच्याही हातात हे शस्त्र जाऊ शकतं आणि ही दुधारी तलवार ती वेगळ्या पद्धतीने वापरता येईल असे सूचक वक्तव्यही छगन भुजबळ यांनी केले. या देशातील राजकीय पक्षांनी या कायद्यातील राक्षसी तरतुदी आहेत त्यात सुधारणा केली पाहिजे. आज विरोधकांवर वेळ आली आहे उद्या दुसऱ्यांवर येईल. हे लोकशाहीसाठी योग्य नाही असेही भुजबळ म्हणाले. 

पवारांचा त्या बँकेशी काहीही संबंध नाही, बँकेत संचालक झाले नाही, कधी कुणाला आदेश दिले नाहीत. त्यामुळे पवारांवर असा गुन्हा दाखल करणं याचा सगळ्यांनी निषेध करायला हवा. पवारा़ंवरील गुन्ह्याच्या निषेध राज्यातील सर्व जनतेने केला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांतील व्यक्तीने याचा निषेध केला पाहीजे असेही भुजबळ म्हणाले.