पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने राजू शेट्टी आक्रमक

'चूकीच्या पद्धतीने आमच्या पदाधिकाऱ्यांवर हद्दपारीच्या नोटीस दिल्या'

Updated: Oct 9, 2019, 03:38 PM IST
पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने राजू शेट्टी आक्रमक  title=

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. आता कोणाविरुद्ध लढायचे आहे ? कोण बंडखोर आहे ? कोणाचे बंड शमले हे स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्ष आता आपले मुद्दे आणि आश्वासने घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. या पार्श्वभुमीवर माजी खासदार राजू शेट्टी हे आक्रमक होताना दिसत आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल झाल्याने ते संतापले आहेत. यासंदर्भात ते निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कोणतेही व्यक्तीगत गुन्हे दाखल नाही, दंगली, ब्लकमेलिंग, मारामारी, खंडणी किंव्हा अन्य व्यक्तिगत गंभीर स्वरूपाचे कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. आमच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते फक्त आंदोलनाचे आहेत. मात्र चूकीच्या पद्धतीने आमच्या पदाधिकाऱ्यांवर हद्दपारीच्या नोटीस दिल्या आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

दोन वर्षांपेक्षा जास्त हद्दपारीची नोटीस बाजवण्याचा पोलिसांना अधिकार नाही. शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी आम्ही चळवळ उभा करायच्या नाही का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणात निवडणूका घेण्यात रस नाही, ते वातावरण बिघडवू पाहत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.