List of 12 MLA Wanted To Go From Shinde Group To Thackeray Group: निर्भय बनो मोहिमेचे संयोजक असीम सरोदेंनी राज्याच्या राजकारणात भूकंप घडवू शकतो असा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील 12 आमदार हे उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचा दावा सरोदेंनी केला आहे. सरोदे यांनी चंद्रपूरमधील कार्यक्रमामध्ये अगदी या आमदारांच्या मतदारसंघांपासून नावांपर्यंतची यादीच वाचू दाखवली आहे. मात्र सरोदेंनी वाचलेल्या यादीतील 2 आमदार आधीच उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. त्यामुळे त्यांच्या या दाव्याबद्दल शंकाही घेतली जात आहे. सरोदेंनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाणे जिल्ह्याच्याबाहेर कोणी ओळखत नाही, असा टोलाही लगावला आहे.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणारे 12 आमदार उद्धव ठाकरेंकडे परतण्यासाठी उत्सुक आहेत," असं सरोदेंनी म्हटलं आहे. पुढे या आमदारांची यादी वाचून दाखवताना सरोदेंनी पालघरचे श्रीनिवास वणगा, चोपडा मतदारसंघाच्या लता सोनावणे, अलिबागचे महेंद्र दळवी पुन्हा ठाकरे गटाकडे परततील असं म्हटलं आहे. मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर, एरंडोलचे चितामणराव पाटील, बालापूरचे नितीन कुमार तळे, औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे प्रदीप जयस्वाल, छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे उदयसिंह राजपूत, साताऱ्यातील कोरेगावचे महेश शिंदे आणि राधानगरीचे प्रकाश आंबीटकर यांनाही शिंदे गटातून पुन्हा ठाकरेंकडे जायचं आहे असा दावा सरोदेंनी केला आहे. "हे 12 जण ठाकरे गटामध्ये पुन्हा शरण येण्यास तयार आहेत. कारण त्यांना लक्षात आलं की आपलं या माणसाबरोबर काही भविष्य नाही. या माणसाला ठाणे जिल्ह्याबाहेर ओळख नाही," असं सरोदे म्हणाले.
"राष्ट्रवादीचे सुद्धा अनेकजण परत येणार अशी बातमी आली आहे. शरद पवारांकडे ते परत जाणार आहे. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हेच ठरवलं पाहिजे की विकला गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी, शरद पवारांनी ठरवलं नाही तर आम्ही मतदारांनी ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा निवडून देता येणार नाही. आपल्याला कुठेतरी थोडीफार इमानदारी शिल्लक असलेले लोक निवडून देता येतील. तशी लोक निवडून देण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे," असं असिम सरोदेंनी आपल्या भाषणात म्हटलं.
नक्की वाचा >> 'मोदींसमोर उद्धव ठाकरेंची औकात काय? उद्धव, त्यांचा मुलगा आणि पत्नी रात्री..'; रामदास कदमांचा हल्लाबोल
असिम सरोदेंनी 12 आमदार परततील असा दावा केला असला तरी नावं मात्र 11 आमदारांची घेतली आहेत. मात्र यापैकी 2 आमदार यापूर्वीच ठाकरे गटात आहेत. छत्रपती संभाजी नगरचे उदयसिंह राजपूत यांनी आपण ठाकरेंबरोबर असल्याचं सांगितलं आहे. पक्षात फूट पडल्यानंतर राजपूत यांनी, "मला 50 कोटींहून अधिकची ऑफर देण्यात आली होती. एका गाडीमध्ये माझ्या घरी पैसेही आले होते. माझ्याकडे याचं सीसीटीव्ही फुटेजही आहे. मात्र मी गद्दार नाही. मला पैशांनी विकत घेता येणार नाही. मी असं केलं असतं तर मुलांना तोंड कसं दाखवलं असतं?" असं म्हटलं होतं. याचप्रमाणे बालापूरचे नितीन कुमार तळे ऊर्फ नितीन देशमुख हे राजकीय नाट्य घडलं त्यावेळी अडीच वर्षांपूर्वी शिंदे गटाबरोबर गुवाहाटीला गेले होते. मात्र आपल्याला फसवून तिथे नेलं होतं असा दावा त्यांनी नंतर केला होता. त्यानंतरपासून नितीन कुमार तळे हे उद्धव ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहिले आहेत.