मावळच्या सोन्या- खासदार, सोन्या- राजाला मिळाला तुकोबांचा पालखी रथ ओढण्याचा मान

आषाढी वारीच्या तयारीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत.   वारीदरम्यान वारक-यांना कुठलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं.

वनिता कांबळे | Updated: Jun 1, 2023, 07:50 PM IST
मावळच्या सोन्या- खासदार, सोन्या- राजाला मिळाला तुकोबांचा पालखी रथ ओढण्याचा मान title=

Ashadhi Ekadashi 2023 : सगळ्यांना ओढलागली आहे ती विठू माऊलीच्या दर्शनाची. सर्वत्र आषाढी एकादशीची (Ashadhi Ekadashi 2023) जोरदार तयारी सुरु आहे. जगतगुरु संत तुकोबांचा पालखी रथ ओढण्याचा मान यावर्षी मावळच्या सोन्या- खासदार तसेच सोन्या- राजाला मिळाला आहे.  अठरा बैल जोडीतून यांची निवड झाली आहे. 

जगतगुरु संत तुकोबांचा पालखी रथ ओढण्याचा मान सुरेश मोरे कुटूंबातील सोन्या-खासदार ला मिळाला आहे. सुरेश मोरे हे वारकरी संप्रदायातील असून गेल्या काही वर्षांपासून पालखी रथ ओढण्याचा मान मिळावा म्हणून ते प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या बैलांना पालखी रथ ओढण्याचा मान मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. 

देहू संस्थांनकडे एकूण 18 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी सुरेश मोरे यांच्या बैलजोडीला रथ ओढण्याचा मान मिळाल्याने मोरे कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तसेच महेंद्र झिंझुर्डे यांच्या "सोन्या-राजा" या बैलजोडीला मिळाला आहे. आलेल्या अर्जापैकी बैलांची चाचणी करून यावर्षिचा मान सोन्या आणि राजा या बैल जोडीला देण्यात आला आहे. यावर्षीचा 338 वा पालखी सोहळा असणार आहे.

अशी केली जाते मानाच्या बैलजोडीची निवड

पालखीच्या रथाला जोडण्यासाठी दिमाखदार, ऐटबाज आणि देखण्या बैलजोडीची निवड करण्याचे आव्हान संस्थानपुढे होते. योग्य बैलजोडीची निवड करण्यासाठी संस्थानची समिती निर्णय घेणार होती. या समितीच्यावतीने निवडण्यात आलेल्याच बैलजोडीला अधिकृत मान देण्यात येतो. या बैलजोडीचे परिक्षण करताना संस्थानाची समिती प्रत्यक्ष अर्जदारांच्या दावणीला जाऊन बैलांचा रंग, शिंगे, खुर, क्षमता, ताकद, वशिंड,शेपटी, उंची, बैलाची चाल एकूणच या सर्वांचे परिक्षण करून बैल जोडीची निवड करण्यात येते.

आळंदी मध्ये माऊलींच्या पालखीच्या बैल जोडीची मिरवणूक

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 11 जून ला पंढरपूकडे प्रस्थान करणार आहे. यावर्षी माऊलींचा रथ ओढण्याचा मान आळंदीमधील भोसले कुटुंबाच्या सर्जा- राजा बैलजोडीला मिळाला आहे. या बैल जोडीची गुरुवारी वाजत गाजत प्रदक्षिणा मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या महाद्वारात पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांच्या हस्ते मानकरी भोसले यांना सन्मानित करण्यात आले. रथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबाने कर्नाटकमधून खिलार जातीची बैलजोडी विकत घेतली. 

 ज्ञानेश्वर महाराज मंदिर समिती विश्वस्थाकडून पालखी मार्गाची पाहणी 

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काही दिवसच उरलेत. त्यापार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर महाराज मंदिर समिती विश्वस्थाकडून पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली. वारीदरम्यान वारक-यांना कुठलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.