नवी दिल्ली - भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी धावून आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधत आहेत. पण अद्याप ओवैसींचा पक्ष त्यांच्या या महाआघाडीत सहभागी झालेला नाही. आता या महाआघाडीत सहभागी होण्यासाठी ओवैसी यांनी राहुल गांधींपुढे एक अट ठेवली आहे. ही अट अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्या फायद्याची आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी लोकसभेच्या सन्मानजनक जागा सोडण्यास काँग्रेस तयार असेल, तरच महाआघाडीत येण्यास आम्ही तयार आहोत, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.
नांदेडमध्ये एका जाहीर सभेत ओवैसी म्हणाले की, मला महाराष्ट्रात लोकसभेसाठी एकही जागा नको. पण माझी अशी इच्छा आहे की माझे मोठे बंधू प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी राज्यात काँग्रेसने सन्मानजनक जागा सोडाव्यात. राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेची तयारी दर्शविली आहे. ते आमच्या पक्षाशी बोलण्यास तयार नाहीत. ठिक आहे. मी अत्यंत काळजीपूर्वक आणि गंभीरपणे हे सांगू इच्छितो की जर राहुल गांधी, शरद पवार यांना एआयएमआयएमशी चर्चा करायची नसेल, तर ठिक आहे. मी चर्चा करण्याची मागणी करणार नाही. पण त्यांनी मोझे मोठे बंधू प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करायला हवी. प्रकाश आंबेडकर यांचा ज्या जागांवर हक्क आहे. त्या त्यांना दिल्याच पाहिजेत. मला एक पण सीट देऊ नका. पण त्यांना हव्या असलेल्या जागा त्यांना द्या, असे ओवैसी यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासाठी तुम्ही जितक्या जागा द्याल. त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. सांगा अशोक चव्हाण... तुम्ही याला तयार आहात का? तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारता. आज मी तुम्हाला ऑफर देतो. तुम्ही तयार आहात का? असाही प्रश्न ओवैसी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारला.
गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी भारिप-बहुजन महासंघ आणि एआयएमआयएम यांनी एकमेकांसोबत आघाडी केली होती. राज्यातील दलित आणि मुस्लिमांच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यावेळीच अभ्यासकांनी म्हटले होते.