हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर : राज्यात कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. काल औरंगाबादमध्ये पैठक तालुक्यातील एका गावात सशस्त्र दरोड टाकण्यात आला होता. यावेळी दरोडेखोरांनी 2 महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज शिरुर तालुक्यात दिवसाढवळ्या एका बँकेवर दरोडा टाकण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या पिंपरखेड इथं बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर सशस्त्र दरोडा घातला. दुपारी दीड-दोनच्या सुमारास कारमधून आलेले 5 बंदुकधारी दरोडेखोर सिनेस्टाईल बँकेत घुसले. बँक मॅनेजरला मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून 31 लाख रुपयांची कॅश आणि 2 कोटींचं सोनं लुटून नेलं.
लुटीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. बंदूकीचा धाव दाखवत दरोडेखोरांनी बँकेतील सोनं आणि रोक रक्कम लुटली. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यापूर्वी ATM फोडण्याच्या अनेक घटना घडल्यात. काही दिवसांपूर्वी चाकणमध्ये चक्क RDX लावून एका बँकेचं एटीएम उडवून पैसे लुटण्यात आले होतं. त्यानंतर आता दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकण्यापर्यंत लुटारूंची मजल गेलीये. या भागात नागरिकांमध्ये दहशत पसरली असून लुटारूंना चाप लावण्याची गरज आहे.