हत्या 28 तारखेला मग... यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप

अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपाने खळबळ

Updated: Jul 11, 2022, 07:18 PM IST
हत्या 28 तारखेला मग... यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप title=

अनिरुद्ध दवाळे झी मीडिया, अमरावती : राजस्थानमधल्या उदयपूर आणि महाराष्ट्रातल्या अमरावतीत झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. नुपूर शर्माला पाठिंब्याची पोस्ट शेअर केल्याने अमरावतीत केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले. 

याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. याचा तपास आता NIA कडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thackur) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

यशोमती ठाकूर यांचा राणांवर आरोप
उमेश कोल्हे प्रकरणाची NIA चौकशी करावी अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी गृहमंत्री अमित शहा यांना 27 तारखेला पत्र लिहून केली होती. या पत्रात खासदार नवनीत राणा यांनी उदयपूरमध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख केला होता. मात्र उदयपूर इथल्या हत्याकांडाची घटना ही 28 तारखेला घडली असून खासदार नवनीत राणा यांना या घटनेची एक दिवस आधी कशी माहिती झाली असा सवाल माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे आता खासदार नवनीत राणा यांचीही चौकशी करावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे. इतकंच नाही तर उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याच्या जवळचा असल्याचा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे. हत्येचा मास्टरमाईंड इरफान खान याने नवनीत राणा यांचा प्रचार केला होता, असाही आरोप आहे.