अमरावतीतील गायब मुलीचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप, Love Jihad प्रकरणाला वेगळं वळण

खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप करत पोलीस स्थानकात केला होता राडा

Updated: Sep 9, 2022, 04:58 PM IST
अमरावतीतील गायब मुलीचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप, Love Jihad प्रकरणाला वेगळं वळण

अनिरुद्ध दवाळे, झी मराठी, अमरावती :  शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका 19 वर्षीय युवतीचं अपहरण झाल्याचा दावा करत या प्रकरणाचा लव्ह जिहादचा (Love Jihad) संबंध असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) तसंच भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला होता. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अमरावती इथून गायब झालेली तरुणी सातारा इथं सापडली असून पोलिसांनी त्या तरुणीची चौकशी करुन तिला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आलं आहे. 

नवनीत राणांचा दावा तरुणीने फेटाळला
पोलिसांनी दिलेल्या जबाबात या तरुणीने मला कोणीही पळवुन नेलं नव्हतं. मी बाहेर शिक्षणासाठी जात होते. नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे असा धक्कादायक खुलासा तरुणीने माध्यमांशी बोलतांना केला. बेपत्ता मुलीच्या वक्तव्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी केलेले आरोप निरर्थक ठरले आहेत.

प्रसार माध्यमांशी काय बोलली संबंधित तरुणी
मला कोणीही पळवुन नेलं नाही, मी स्वतः घरातून गेले होते.  नवनीत राणा ज्या बोलत आहे ते पूर्णपणे खोटं आहे, यामुळे माझी खूप बदनामी होत आहे, अशी धक्कादायक प्रतिक्रिया तरुणीने दिली आहे. 

खासदार नवनीत राणांचा राजापेठ पोलीस ठाण्यात राडा
खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये राडा केला होता. मुलीला आत्ताच्या आता आमच्यासमोर हजर करा, म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसंच पोलिसांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करत जवळपास 20 मिनिटं पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. राणा दाम्पत्याने पोलिसांवर गंभीर आरोपही केले होते.