Amravati Loksabha: अमरावतीच्या बहुरंगी लढतीचा फायदा कोणाला? नवनीत राणांविरुद्ध बच्चू कडूंचा 'प्रहार'

Amravati Loksabha Election 2024 Political Scenario : अमरावतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. कारण महायुतीच्या घटकपक्षांमध्येच असलेला टोकाचा संघर्ष... या आखाड्यात कोण बाजी मारणार? पाहूयात स्पेशल रिपोर्ट

सौरभ तळेकर | Updated: Apr 2, 2024, 09:39 PM IST
Amravati Loksabha: अमरावतीच्या बहुरंगी लढतीचा फायदा कोणाला? नवनीत राणांविरुद्ध बच्चू कडूंचा 'प्रहार' title=
Amravati Loksabha Anandraj Ambedkar vs Navneet Rana

Anandraj Ambedkar vs Navneet Rana : अमरावती.... विदर्भाची कुलस्वामिनी आई अंबा आणि एकवीरा देवीचं पावन क्षेत्र... रुक्मिणीचं माहेरघर कौंडण्यपूरही याच अमरावतीतलं... आदिवासी संस्कृती जपणारं मेळघाट हे अमरावतीचं वैशिष्ट्य... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, कुष्ठमित्र पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्यासह देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशा मान्यवरांची जन्म आणि कर्मभूमी... विदर्भातील नागपूरनंतरचा दुसरा महत्त्वाचा जिल्हा... मात्र विकासाच्या तुलनेत अमरावती नागपूरपेक्षा कित्येक कोस दूर आहे.

अमरावती... विकासाची मंद गती

मेळघाटातील आदिवासी पिण्याचे पाणी, वीज यापासून वंचित आहेत. कुपोषण, बाल मृत्यू, माता मृत्यू तर मेळघाटच्या पाचवीलाच पुजलेत. इथल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये साधी एआरआयची सोय नाही. गर्भवती महिलांना वऱ्हांड्यात झोपावं लागतं. अचलपूरची फिन्ले मिल बंद पडली, बडनेरामधील रेल्वे वॅगन कारखाना अजून सुरू झालेला नाही. अमरावतीत संत्रा पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, मात्र संत्रा प्रक्रिया उद्योग नसल्यानं शेतकरी हतबल झालेत. मेळघाट, चिखलदरा यासारखी निसर्गरम्य ठिकाणं आहेत. मात्र या पर्यटनस्थळांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.

अमरावतीचं राजकीय गणित 

1996, 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेच्या अनंत गुढेंनी अमरावतीतून विजयाची गुढी उभारली. 2009 मध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांनी रिपब्लिकन गवई गटाचे राजेंद्र गवई यांना 61 हजार मतांनी हरवलं. 2014 मध्ये अडसूळांनी दुस-यांदा राष्ट्रवादीच्या नवनीत राणांना सव्वा लाख मतांनी पराभूत केलं. मात्र 2019 मध्ये अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या नवनीत राणांना शिवसेनेच्या अडसूळांना 36 हजार मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. विधानसभेचा विचार केला तर काँग्रेसचे 3, प्रहार जनशक्ती पार्टीचे 2, आणि भाजप समर्थक अपक्ष रवी राणा असे आमदार आहेत.

विद्यमान खासदार नवनीत राणांना आता भाजपनं उमेदवारी दिलीय. उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केल्याची बक्षिसी भाजपनं त्यांना दिली. गेल्यावेळी राणांनी निवडून आल्यावर भाजपला पाठिंबा दिल्यानं मुस्लीम आणि दलित मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यात त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. राणांना उमेदवारी दिल्यानं महायुतीतच नाराजीचा स्फोट झालाय. राणांच्या विरोधात काम करण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी दिलाय. प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू यांनी तर राणांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची घोषणाच केलीय.

भाजपच्या नवनीत राणा यांचं तिकीट जाहीर होण्याआधीच काँग्रेसनं दर्यापूरचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांना मैदानात उतरवलंय. शिवसेनेतून आलेल्या दिनेश बूब यांना उमेदवारी देऊन बच्चू कडूंच्या प्रहार पक्षानं बंडाचा झेंडा फडकवलाय. वंचित बहुजन आघाडीनं प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी दिलीय. तर प्रकाश आंबेडकरांचे भाऊ आनंदराज आंबेडकर देखील अमरावतीतून रिंगणात उतरलेत. त्यामुळं अमरावतीमध्ये यावेळी बहुरंगी लढत पहायला मिळणार आहे.

दरम्यान, गेल्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणा निवडून आल्या. यावेळी मित्रपक्षांपासून मतदारांपर्यंत त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर दिसतोय. ही नाराजी त्या दूर करू शकतील का? आणि बहुरंगी लढतीचा फायदा नेमका कुणाला होणार? यावर अमरावतीचा निकाल अवलंबून असणार आहे.