अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती : प्रेम हे आंधळं असतं म्हणतात. या प्रेमासाठी वाटेल ते करायलाही मन तयार होतं. हे म्हटलं जातं ते काही खोटं नाही. याचं कारण म्हणजे चक्क एक दृष्टीहीन युवती आपल्या प्रेमासाठी 695.2 किलोमीटरचं अंतर पार करून गेली आहे. एकीकडे एसटीचा संप सुरू असताना या तरुणीनं आपल्या प्रेमासाठी चक्क इतकं अंतर पार केलं.
दृष्टीहीन असलेल्या तरुणीनं आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गाठलेल्या या अंतराची चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही तर सातासमुद्रापारही आहे. ज्यांना दृष्टी असते ते मात्र प्रेमात सहज पराभव स्वीकारतात. पण या दृष्टीहीन तरुणीनं डोळसपणे आपलं प्रेम मिळवलं आहे.
मंडळी जन्मत: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या या दांपत्याने प्रेमाच्या खडतर रस्त्यावर चालून विजय मिळवला. कारण मुलीच्या घरुन विरोध असतानाही प्रेमापोटी आणि आपल्या प्रियकरासाठी आरतीने सांगलीवरून थेट अमरावती गाठलं.
अमरावती जिल्ह्यातील माहूली येथील राहुल बावणे याची सांगलीतील आरती कांबळे या युवतीसोबत 6 वर्षांपूर्वी दृष्टीहिनांच्या स्नेहसंमेलनात गोंदियामध्ये भेट झाली. आरतीने या संमेलनात गायलेल्या गाण्यावर राहुल चांगलाच फिदा झाला.
आरतीचं गाणं ऐकून राहुल तिच्या प्रेमात पडला. दोघांच्या घरच्या मंडळींचा लग्नाला तीव्र विरोध होता. राहुल बँकेची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. तर आरती उत्तम गायिका आहे.
राहुलचं कुटुंब त्याच्या पाठीशी ठाम उभं होतं. तर आरतीच्या कुटुंबाकडून लग्नासाठी विरोध होता. त्यामुळे आरतीसमोर आयुष्य संपवणं किंवा लग्न करणं हे पर्याय होते. त्यातील तिने लग्नाचा पर्याय निवडला. राहुलच्या घरच्यांकडून लग्नासाठी होकार मिळाला. त्यानंतर दृष्टीहीन आरतीनं सांगलीहून 695.2 किलोमीटरचं अंतर पार करत थेट अमरावती गाठलं आणि राहुलच्या प्रेमबंधनात लग्न करून अडकली.