कोल्हाटी समाजातल्या तमाशा कलावंतीणीच्या पोरानं खेचून आणलं यश

'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळेची...

Updated: May 2, 2018, 03:56 PM IST
कोल्हाटी समाजातल्या तमाशा कलावंतीणीच्या पोरानं खेचून आणलं यश  title=

मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर  : ही बातमी आहे एका भन्नाट यशोगाथेची... त्याचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत... तमाशालाच जिथे पंढरी समजली जाते, अशा कोल्हाटी समाजातला तो मुलगा... आज तो यूपीएससी उत्तीर्ण झालाय... प्रत्येकानं पाहावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही माय-लेकाची गोष्ट...

घुंगरू आणि ढोलकीसोबत जगणं

एकदा का पायी घुंगरू बांधले... की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात... एकदा का ओठ रंगवले की सगळं दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा... ढोलकीवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन फक्त नाचत राहायचं... कोल्हाटी समाजातल्या बायकांचं हेच जगणं... सगळं आयुष्य  वेचायचं ते या लोककलेची सेवा करण्यात... लग्न वगैरे काही भानगडच नाही... 'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळेची...

'कलेक्टर व्हायचंय....'

नगरमधली राजश्री काळे... लोककलेवर निरातिशय प्रेम करणारी, लोककला जगणारी... आणि लावणीला जिवंत ठेवण्यासाठी नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवणारी... व्यवसायानं तमाशा कलावंत... तमाशाच्या याच वातावरणात तिचं पोर वाढलं...  तमाशाच्या सुपारीसाठी गावोगाव फिरावं लागतं... त्यात पोराबाळांची परवड होते... शिक्षणाचा तर मागमूसही नसतो. अमित कळत्या समजत्या वयाचा झाल्यावर त्याची ढोलकीशी सलगी नको, म्हणून राजश्रीनं काळजावर दगड ठेवत पोटच्या पोराला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं. अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं काही तिनं ताकदीनं पेलला. लहानपणापासून पोराला समजावलेलं, तुला कलेक्टर व्हायचंय... पोरानंही आईच्या कष्टांचं सोनं केलं... आज अमित यूपीएससी उत्तीर्ण झालाय. निकाल लागल्यापासून घर कसं आनंदानं गजबजून गेलंय.   

यशात माऊलीचा हात... 

अमित मारुतराव काळे... यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेलं कोल्हाटी समाजातलं हे कदाचित पहिलंच नाव... कोल्हाटी समाज हा तसा  कायमच शिक्षणापासून कोसो दूर... पण पोटाला कितीही चिमटे बसले तरी आणि नाचता नाचता पायाला भेगा पडल्या तरी पोराला शिकवायचंच, हा या माऊलीचा निश्चय... 

राजश्री आजही नगर - पुणे रस्त्यावर कालिका कला केंद्र चालवते... तिथे रोज संगीत बारी होते... लावणी-सम्राज्ञी म्हणून राजश्रीचा गौरव झालाय... पण, आज यूपीएससीतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय. या माऊलीनं याच दिवसासाठी  केला होता अट्टाहास...  तिच्या कष्टांची आज फुलं झालीत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x