पालघर : पालघर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या आणि वैतरणा या प्रमुख नद्यांची पातळी वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय पालघर, बोईसर, साफळे, डहाणू, बोर्डी या भागातही जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय.
#WATCH Maharashtra: Streets waterlogged & houses submerged in water, after heavy rainfall in Palghar. pic.twitter.com/Z32Jj1htaM
— ANI (@ANI) August 3, 2019
पावसामुळे पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा उशिराने सुरू असली तरी उपनगरीय लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. रात्रभर वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी घराचा काही भाग कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पावसामुळे पालघरमधील काही खाजगी शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. तर आज दुपारी समुद्राला मोठी भरती असल्याने सातपाटी, डहाणू खाडी या भागात पाणी शिरण्याची भीती आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्र, कोकण आणि गोवामध्ये रेड अलर्ट जारी केलीय. जोरदार वाऱ्यांमुळे या भागात अतिवृष्टीची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येतोय. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. समुद्रानजिक राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.