...तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार, बाकीच्या चर्चा व्यर्थ - अजित पवार

महाविकास आघाडी सरकारबाबत कोणीही वादग्रस्त वक्तव्य  कोणीही करु नये, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. 

Updated: Jan 28, 2020, 04:45 PM IST
...तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार, बाकीच्या चर्चा व्यर्थ - अजित पवार title=

अमरावती : जो पर्यंत मुख्यमंत्री उध्वव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा महाविकास आघाडी सरकारवर वरदहस्त आहे तोपर्यंत बाकीच्या चर्चा व्यर्थ आहे. यावर चर्चा करणे योग्य नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना सल्ला दिला आहे. तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारमध्ये काम करत असताना शंका कुशंका आणि गैरसमज निर्माण होईल, असे वक्तव्य कोणीही करु नये, असा सल्लादेखील अजित पवार यांनी दिला. 

आज अमरावती येथे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांची आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. निधी अभावी रखडलेले राज्यातील अनेक प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून पूर्ण करण्याची आमच्या सरकारची भूमिका असल्याचे पवार यांनी सांगितले. 

NRC आणि CAA संदर्भात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्या निकालाकडे आमचे लक्ष आहे. मात्र, NRC आणि CAA कायद्यामुळे राज्यातील कोणत्याही नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले असून महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. आणि त्याप्रमाणेच सर्वांना काम करायचे आहे, असे ते म्हणालेत. 

सरकारमध्ये काम करत असताना शंका-कुशंका आणि गैरसमज निर्माण होईल असे वक्तव्य कोणीही करु नये, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांचा पाठिंबा, वरदहस्त आहे. तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारबाबत बाकीच्या चर्चा करणे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकारच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या महात्मा फुले कर्ज माफी योजनेतून शेतकऱ्यांनासरकारने आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी मदत झाली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली असून दोन लाखा पेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना ही मदत  केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.