शरद पवारांनी राजकारणात संधी दिल्यावरुन टीका करणाऱ्यांना अजित पवार म्हणाले, 'अपघातानेच मी..'

Ajit Pawar On His Political Journey: अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकदा त्यांच्या विरोधकांनी टीका करताना शरद पवारांचा उल्लेख केला. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणल्याचा उल्लेख करत त्यांच्याविरोधातच बंडखोरी करण्यावरुन अजित पवारांवर निशाणा साधला. याच टीकेला आता अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 26, 2024, 09:11 AM IST
शरद पवारांनी राजकारणात संधी दिल्यावरुन टीका करणाऱ्यांना अजित पवार म्हणाले, 'अपघातानेच मी..' title=
अजित पवारांनी पत्रामधून व्यक्त केल्या भावना

Ajit Pawar On His Political Journey: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवरुन वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आल्या. शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवारांवर टीका करताना ज्या शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं त्यांच्याच विरोधात अजित पवारांनी भूमिका घेतल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मे 2023 मध्ये अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अनेकदा शरद पवारांनी अजित पवारांना राजाकरणात आल्याचा उल्लेख करत टीका केली. मात्र आता या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

अपघाताने राजकारणात आलो

अजित पवारांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन स्वत:ची भूमिका मांडणारं एक पत्र पोस्ट केलं आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टी, शिवसेनेसोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमातून विविधप्रकारे आजही चर्चा होत आहे. याबाबत माझी नेमकी भूमिका" असं म्हणत अजित पवारांनी शेअर केलेल्या पत्रामध्ये 1991 साली आपण राजकारणात अपघातानेच आल्याचं म्हटलं आहे. थेट शरद पवारांचा उल्लेख अजित पवारांनी या पत्रात केला नसला तरी त्यांचा इशारा शरद पवारांच्याच दिशेने असल्याचं पत्रातील मजकुरावरुन स्पष्ट होत आहे.

मी संधीचं सोनं करण्यासाठी फार कष्ट घेतलं

"सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करती आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती. त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली," असं अजित पवार म्हणाले आहेत. मात्र या संधीचं सोनं करण्यासाठी आपण फार कष्ट घेतलं असल्याचंही अजित पवारांनी नमूद केलं आहे. "संधी मिळाल्यानंतर त्या संधीची सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला. कष्ट व परिश्रम केले. इतर सर्व जाबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करुन समाजकारणासाठी स्वत:ला वाहून घेतले," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> वेगळी भूमिका अन् भविष्य... अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं

पहाटे पाचपासून काम सुरु करण्याची सवय लावली कारण...

"माझा राजकारणामधील प्रवास गेल्या तीन दशकांपासून सुरु आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच कायम माझा भर राहिला. पहाटे पाचपासून काम सुरु करण्याची सवय स्वत:ला लावून घेतली कारण हातात अशलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्ग लागावीत. ज्या मतदरांनी भरभरुन प्रेम केलं, विश्वास व्यक्त केला त्यांचे जीवमान अधिक कसे उचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला," असं म्हणत अजित पवारांनी आपल्या कामाची पद्धतही अधोरेखित केली आहे.

नक्की वाचा >> '...म्हणून मी सत्तेत सहभागी झालो'; 9 महिन्यांनंतर अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

विकासालाच अधिक प्राधान्य

"पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्दापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले. आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम असेल," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

कोणाचाही अनादर केला नाही

तसेच आपण कोणाचाही अनादर केला नसल्याचं सांगायला अजित पवार विसरले नाहीत. "कायमच वडिलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्करांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे. सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्ग लागतील ही स्वच्छ भूमिका आहे. यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल," असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.