नगरची जागा राष्ट्रवादीचीच - अजित पवार

आघाडीचे जागा वाटप ८ तारखेपर्यंत होण्याची शक्यता 

Updated: Mar 3, 2019, 03:16 PM IST
नगरची जागा राष्ट्रवादीचीच - अजित पवार  title=

पुणे : आघाडीचे जागावाटप आठ मार्चपर्यंत होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. सध्या राजू शेट्टींसोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेट्टींनी दोन जागांची मागणी केली असून एक जागा देण्याची तयारी असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. जातीवादी पक्षांचा फायदा होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी वंचित बहुजन विकास आघाडीला चार जागा द्यायला तयार असल्याचे पवारांनी स्पष्ट सांगितले आहे. तसेच अहमदनगरची जागा राष्ट्रवादीचीच होती आणि राष्ट्रवादीचीच राहणार असल्याचे पवारांनी सांगितले आहे. 

आघाडीचे जागा वाटप ८ तारखेपर्यंत होण्याची शक्यता असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. १ तारखेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या धुळे आणि मुंबईमध्ये सभा होत्या. त्या सभेसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते व्यस्त होते. या सभेनंतर आता जागा वाटपाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी म्हटले. राजू शेट्टी यांची दोन जागांची मागणी आहे. आम्ही एक जागा त्यांना देण्याचे कबूल केले असून आम्ही काँग्रेसलाही त्यांच्याकडील एक जागा राजू शेट्टी यांना देण्याची विनंती केली आहे.  

आंबेडकरांना ४ जागा देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी तयार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि प्रकाश आंबेडकर अशी दोघांची मते एकत्र केली तर भाजपाच्या उमेदवारापेक्षा जास्त मतं होतात. आता याबाबत निर्णय काय घ्यायचा हे सर्वस्वी प्रकाश आंबेडकर यांच्या हातात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.