माझी व त्यांची..., मोदी-शाहांमधील 'हे' 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार

Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: 2023 साली मे महिन्यामध्ये अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत मोठ्या गटासहीत सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 26, 2024, 11:06 AM IST
माझी व त्यांची..., मोदी-शाहांमधील 'हे' 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार title=
अजित पवारांनी पत्रात केला खुलासा

Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर 9 महिन्यांनी लिहिलेल्या एका पत्रातून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याची कारणं सांगितली आहेत. आपली भूमिका स्पष्ट करणारं एक पत्रच अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पत्रात अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातील 2 गुण आवडल्याचं नमूद करत भाजपाला पाठिंबा देण्यासाठी हे गुण महत्त्वाचे ठरल्याचं म्हटलंय.

मोदी-शाहांचे हे 2 गुण आवडले

अजित पवार यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये एकूण 10 मुद्द्यांचा समावेश आहे. हे पत्र अजित पवारांनीच आपल्या एक्स (ट्वीटर) हॅण्डलवरुन शेअर केलं आहे. पत्रातील 10 मुद्द्यांपैकी आठव्या मुद्द्यामध्ये मोदी आणि शाह यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मोदी आणि शाहांच्या कार्यपद्धतीचं कौतुक अजित पवारांनी केलं आहे. "या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे तो मला महत्त्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले," असं अजित पवार म्हणालेत.

...म्हणून त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय

"माझी व त्यांची (मोदी-शाहांची) कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे. कामावर आमचे जास्त प्रेम आहे. त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे," असं अजित पवार म्हणाले. 

नक्की वाचा >> वेगळी भूमिका अन् भविष्य... अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं

लोकांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न

"या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही (मोदी-शाहांबरोबर जाण्याची) भूमिका स्वीकारली आहे. मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे," असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. "वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचवता येईल, मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षमक कशा करता येतील याचा विचार आहे," असंही अजित पवारांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांनी राजकारणात संधी दिल्यावरुन टीका करणाऱ्यांना अजित पवार म्हणाले, 'अपघातानेच मी..'

पाठिंबा आणि आशिर्वाद हवा

अजित पवारांचं पत्र सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी अगदी सविस्तरपणे आपली भूमिका स्पष्ट करताना भविष्यातील वाटचालीसाठी महाराष्ट्रातील जनतेकडून पाठिंबा आणि आशिर्वाद मागितले आहेत.