Ajit Pawar NCP Internal Fight In Women Leaders: महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरुन आतापासूनच चर्चा असतानाच पक्षांतर्गत संघर्षाच्या बातम्याही समोर येत आहेत. असं असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर सुचवण्यात येणाऱ्या संभाव्य तीन नावांवरुन महिला नेत्यांमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अजित पवारांच्या पक्षाकडून रुपाली चाकणकर यांना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र यावरुन आता पक्षातील त्यांच्या सहकारी रुपाली पाटील ठोंबरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर तशी पोस्टच केली आहे. त्यानंतर आपली भूमिका त्यांनी 'झी 24 तास'शी बोलाताना मांडली.
एका मराठी वृत्तपत्रामध्ये छापून आलेली विधानपरिषदेवर अजित पवारांच्या पक्षाकडून माजी खासदार आनंद परांजपे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळेंच्या नावाची शिफार केली जाणार असल्याची बातमी रुपाली ठोंबरे पाटील यांनी शेअर केली आहे. ही बातमी शेअर करताना त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. "एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार?" असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्टमधून उपस्थित केला आहे.
"कालपासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले," असंही रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. "पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल," असं रुपाली पाटील ठोंबरेंनी म्हटलं आहे.
'झी 24 तास'शी बोलाताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी, "माझा रुपाली चाकणकर यांना विरोध नाही. माझी नाराजी नाही. जर आपल्या पक्षात एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार वागण्याचं ठरलेलं असताना एकाच महिलेला किती पदं देणार? यावर माझा आक्षेप आहे. सर्वांना समान संधी दिली पाहिजे," असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा वाटपाचं सूत्र ठरल्याचं समजतं. 12 जागांपैकी प्रत्येक पक्ष 4-4 जागा वाटून घेण्याची शक्यता होती. मात्र भाजपाने 6 जागांची मागणी केल्याने इतर दोन पक्षांना प्रत्येकी 3 जागा दिल्या जातील.