'फडणवीसांसोबत हवा-पाण्याची चर्चा'; अजित पवारांचा खुलासा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली.

Updated: Dec 9, 2019, 03:52 PM IST
'फडणवीसांसोबत हवा-पाण्याची चर्चा'; अजित पवारांचा खुलासा title=

बारामती : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली. सोलापूरमधील करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाला फडणवीस आणि अजित पवार बाजूलाच बसले होते. या दोघांनी शेजारी शेजारी बसून २० मिनिटं एकमेकांशी गप्पा मारल्या. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.

माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात हवा-पाण्याच्या गप्पा झाल्या, असं अजित पवार म्हणाले. आम्ही काय कोणाचे कायमचे दुश्मन नसतो. त्यामुळे विरोधक किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना नमस्कार करतात, चर्चा होते. संजय शिंदे यांनी आग्रह करून मला लग्नाला बोलावले. त्यांनी लग्नात आमच्या खुर्च्या अशा ठेवल्या की, मी आणि देवेंद्रजी बाजूबाजूला आलो. त्यामुळे थोडीफार आम्ही इकडची तिकडची चर्चा केल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

मंत्रिमंडळ खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. झी २४तासच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यात त्यांनी नकार दिला. बारामतीकरांनी एक लाख ६५ हजाराच्या मताधिकऱ्यानं निवडून दिलं. त्यांची काम करायची असल्याचं ते यावेळी म्हणाले. सिंचन घोटाळ्यासंदर्भात मिळालेल्या क्लीनचिटवर देखील बोलण्यास त्यांनी नकार दिला. उपमुख्यमंत्री व्हावं असं कार्यकर्त्यांना वाटतं मात्र हा निर्णय पक्षप्रमुखांचा असल्याचं ते म्हणाले.

'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी अजित पवार यांनीच माझ्याशी संपर्क साधल्याचे म्हटले होते. शिवसेना आणि काँग्रेससोबत आम्ही सरकार चालवू शकत नाही. त्यामुळे आपण एकत्र येऊन सरकार स्थापन करू. मी या गोष्टीची कल्पना शरद पवार यांना दिली आहे, असा दावा त्यावेळी अजित पवारांनी केल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.