ऐरोलीत पक्षी निरीक्षणाची फेरी बोटीने सोय

   नवी मुंबईतल्या ऐरोली इथे अशाप्रकारे पक्षी निरीक्षण करण्यासाठी खास फेरी बोटीचीही सोय करण्यात आली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 5, 2018, 12:30 PM IST
ऐरोलीत पक्षी निरीक्षणाची फेरी बोटीने सोय title=

स्वाती नाईक, झी मीडिया, ऐरोली :  विविध जातीचे परदेशी पाहुणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन जवळून पाहण्याची दुर्मिळ संधी पर्यावरण विभागानं उपलब्ध करून दिली आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली इथे अशाप्रकारे पक्षी निरीक्षण करण्यासाठी खास फेरी बोटीचीही सोय करण्यात आली आहे.

सिगलपासून जवळपास 205 विविध प्रकारचे पक्षी

ब्लॅक आयबीस, ग्रे हेरॉन, ऍव्होसाईट, रिव्हर्टरनपासून, गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो, तसंच सिगलपासून जवळपास 205 विविध प्रकारचे पक्षी. या साऱ्यांचं प्रत्यक्ष समुद्रात जाऊन जवळून दर्शन घेण्याची संधी, राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या सागरी जीवसृष्टी जैवविविधता विभागातर्फे ऐरोलीत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

फेरी बोटमधून एक तासाची सागरी सफर

फेरी बोटमधून एक तासाची सागरी सफर घडवली जाणार आहे. या फेऱ्या भरती ओहोटीनुसार असणार आहेत. यात पर्यावरण आणि पक्ष्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्यात येणार आहे. सोबतच प्रवाशांच्या सुरक्षेची काळजीही घेण्यात येणार आहे. 

एक फेब्रुवारीपासून सुरु झालेली ही सेवा पावसाळा सुरु होईपर्यंत सुरु राहणार आहे. यासाठी स्थानिकांसोबतच रेस्क्यू टीमही तैनात असणार आहेत. याशिवाय पक्ष्यांची माहिती देणारे गाईडही या फेरी बोटमध्ये असणार आहेत.