वाढीव विजबिला विरोधात आंदोलन; ऊर्जा मंत्री नितीन राऊतांच्या पुतळ्याला मारल्या चपला

अमरावतीत भाजपचा विद्युत कार्यालयाची वीज बंद करून आंदोलन

Updated: Nov 19, 2020, 02:12 PM IST
वाढीव विजबिला विरोधात आंदोलन; ऊर्जा मंत्री नितीन राऊतांच्या पुतळ्याला मारल्या चपला title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : लॉकडाऊन दरम्यान राज्यातील जनतेला आलेल्या वाढीव वीज बिला विरोधात आज अमरावतीत भाजपाच्या वतीने विद्युत विभागाच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून या मुख्य कार्यालयातील वीज बंद करून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. 

राज्यातील जनतेला वाढीव वीज बिल देणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही भाजपच्या वतिने आज करण्यात आली. दरम्यान आंदोलना वेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळन्याचा प्रयत्न मात्र पोलिसांनी हाणून पाडला. 

लॉकडाऊन दरम्यान राज्यातील नागरिकांना आलेल्या वाढीव बिलातून या नागरिकांना सवलत देण्याचे आश्वासन उर्जा मंत्री नितीन राऊत यानी काही दिवसांपूर्वी दिले होते. परंतु दिवाळी संपताच बिलातून नागरिकांना कुठलीही सवलत मिळणार नसून पूर्ण बिल नियमित भरावे लागणार असल्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार विरोधात राज्यातील भाजप आक्रमक झाली असून लॉकडाऊनच्या काळात आलेले सर्व वीज बिल माफ करावे ही मागणी  घेऊन आज राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलन केले.

यावेळी भाजप नेते डॉ अनिल बोंडें यांच्या नेतृत्वाखाली अमरावती मधील विदूत विभागाच्या मुख्य कार्यालयात आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करून विदूत कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला.