पुणे : नालासोपाऱ्यातल्या अवैध शस्त्रसाठ्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. वैभव राऊतपाठोपाठ शरद कळसकर याला नालासोपाऱ्यातून तर सुधनवा गोंधळेकर याला पुण्यातून अटक करण्यात आलीय. या तिघांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. शरदच्या घरातून काही बॉम्ब बनवण्याची कागदपत्रंही जप्त करण्यात आलीय. आगामी सणांच्या दिवसात घातपात करण्याचा कट होता अशी माहिती सूत्रांनी दिलीय. गोंधळेकर हा मुळचा साताऱ्यातील करंज पेठचा आहेय. एटीएसचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तिघांना अटक करण्यात आली असून अधिकचा तपास करून यामागचं तथ्य समोर येईल असं गृहराज्यामंत्री केसरकरांनी सांगितलंय.
सुरुवातीला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक असल्याचे सांगितले जात होते. मात्र, 'सनातन'चे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत हा आमचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट केले. वैभव राऊतनंतर एटीएसकडुन आणखी दोघांना अटक केली आहे. पुण्यातून सुधनवा गोंधळेकरला तर नालासोपाऱ्यातुन आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. अवैध शस्त्रसाठ्याप्रकरणी नालासोपाऱ्यातुन शरद कळसकरला अटक करण्यात आलीआहे. आगामी सणांमध्ये घातपात करण्याची तयारी करण्यात येत होती असे म्हटले जात आहे.
नालासोपारा येथील भांडारआळी परिसरात वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर एटीएसच्या पथकाने गुरुवारी रात्री उशीरा छापा घातला. यावेळी पोलिसांना आठ देशी बॉम्ब आणि स्फोटके तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले. पोलिसांनी वैभव राऊतला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
वैभव आमचा कार्यकर्ता नसला तरी तो एक चांगला व्यक्ती आहे. पोलिसांवर आणि गृहखात्यावर आमचा विश्वास नाही. गृहमंत्री जाणूनबुजून हे घडवत आहेत. आम्ही त्याला शक्य ती मदत करु, असे सनातनचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी म्हटले.
वैभव राऊत हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. तो चांगला माणूस आहे. त्याच्या घरात स्फोटकं सापडणं शक्य नाही. तो असलं काही करू शकत नाही, असा आम्हाला विश्वास आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. सनातन संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असेही पुनाळेकर यांनी सांगितले.