Pune News : पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने (Koyta gang) धुमाकूळ घातला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. या प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्तांनी (Pune Poilce) गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करत कोयते उगारून दहशत पसरविणाऱ्या टोळक्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजपने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचे कौतुक करत पोस्टरबाजी केली आहे. भाजप महाराष्ट्र या फेसबुक पेजवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 'जनतेची सुरक्षा हीच शिंदे फडणवीस सरकारची हमी!
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात यशस्वी कोम्बिंग ऑपरेशन. गुन्हेगारी आळा घालणारे केवळ युती सरकार, असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तस यासोबत शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये हे कायद्याचे राज्य आहे,' कोयत्याच नाही असा उल्लेख केला आहे.
काय म्हटलंय पोस्टरमध्ये?
"हे कायद्याचे राज्य आहे, कोयत्याच नाही, पुण्यात यशस्वी कोम्बिंग ऑपरेशन. दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या धुमाकुळानंतर 3765 गुन्हेगारांची झाडाझडती पिस्तुलासह 145 कोयते जप्त. देवा भाऊंच्या राज्यात गँग कोणतीही असो, मुसक्या आवळल्या जातील!," असे या पोस्टरमध्ये म्हटले आहे.
पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये
दरम्यान, पुणे पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत कारवाई करुन कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी युनिट 2 च्या पथकाने स्वारगेट डायस प्लॉट येथून अक्षय आप्पाशा कांबळे आरोपींकडून 9 कोयते ताब्यात घेतले आहे. तर 1 जानेवारी 2023 ते 12 जानेवारीपर्यंत युनिट 2 ने 185 कोयते आणि 70 आरोपींना ताब्यात घेतले.