कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : गटारीला विदेशी मद्याचे पेलेच्या पेले रिचवले जातात. अनेक जण गटारीची व्यवस्था अगोदरच करतात. हजार ते पाच हजार खर्च करून तुम्ही जी उंची मद्याची बाटली विकत आणलीय तिचं कव्हर जरी विदेशी असलं तरी त्यातलं मद्य विदेशी असेल असं नाही. महागड्या विदेशी मद्यात देशी मद्याची बेमालूम भेसळ करणाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं भिवंडीतून अटक केली आहे. आरोपी विदेशी मद्याच्या बाटलीत गोव्यातून तस्करी करून आणलेली हलक्या प्रतिची दारू मिसळत होते. यासाठी बुचंही बाजारात सहज मिळतात. काही वेळा स्टिकरही बदलले जातात. भेसळयुक्त मद्य बाजारात चढ्या भावानं विकलं जात होतं.
चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडंच दारूत भेसळ केली जाते. जाणकारांच्या माहितीनुसार राज्यात १५ ते २० विदेशी दारूत भेसळ असते. त्यामुळं गटारीला आणलेली तुमची बाटली शंभरवेळी तपासून घ्या.....
भेसळयुक्त दारू ही आरोग्यालाही हानीकारक आहे. भेसळयुक्त दारू प्यायल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल.
असली आणि नकली दारू कोणती हे ओळखणं फारच कठीण आहे. या भेसळयुक्त दारूमुळे अनेकांना गटारीनंतर थेट रूग्णालय गाठावं लागेल.
<iframe width="560" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>