Aadmission : शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरी प्रवेश मिळणार...शिक्षणविभागाचा मोठा निर्णय

शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसेल, तरी यापुढे नववी आणि दहावीच्या प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्रावर तात्पुरता प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय विभागाने घेतला आहे. 

Updated: Jun 17, 2021, 06:15 PM IST
Aadmission : शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरी प्रवेश मिळणार...शिक्षणविभागाचा मोठा निर्णय title=

मुंबई -  शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसेल, तरी यापुढे नववी आणि दहावीच्या प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्रावर तात्पुरता प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय विभागाने घेतला आहे. आधीच्या शाळेचं LC किंवा TC नसेल, तरी वयानुसार प्रवेश देण्यात यावा, असे आदेश शालेय शिक्षण विभागानं दिलेत. आतापर्यंत केवळ 8वी इयत्तेपर्यंत ही तरतूद लागू होती. दाखला नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले जात असल्याचं लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. प्रवेश नाकारणऱ्या मुख्याध्यापक किंवा शाळाप्रमुखांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आलाय. 

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी शाळेचं शुल्क न भरल्याने दाखला देण्यासाठी अनेक शाळा अडवणूक करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता जन्माचा दाखला पाहून संबंधित विद्यार्थ्याच्या वयानुसार त्याला पुढील वर्गात थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इथून पुढे आता शाळा सोडल्याचा दाखला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतेवेळी बंधनकारक असणार नाही. तसंच शाळेचं शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची अडवणूक करणाऱ्या शाळांना या निर्णयामुळे चांगलीच चपराक बसली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा T.C/L.C उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केला आहे, असं या निर्णयात म्हटलं आहे.