Pune Dagdusheth Ganpati : पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ख्याती भारतातच नव्हे तर जगभरात आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा हे लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. चक्क थायलंड फुकेत येथून अनेक भाविक दरवर्षी पुण्यात श्रीं च्या दर्शनाला सातत्याने येतात. त्यातील एक भक्त, फुकेत येथील रहिवासी पापासॉर्ण मिपा यांनी दगडूशेठ च्या सामाजिक कार्याला हातभार लावत जय गणेश रुग्णसेवा अभियानाकरिता दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाकडे पापासॉर्ण मिपा यांनी या रुग्णवाहिका नुकत्याच सुपूर्द केल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पापासॉर्ण मिपा म्हणाल्या, भारतीयांना आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या कार्याला मदत देण्याच्या उद्देशाने या रुग्णवाहिका मी देत आहे. ट्रस्ट गोरगरीब वंचितांना मदत देण्यासोबत विविध रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्यसेवा देत आहे. आमचे देखील भाग्य आहे की आम्ही ट्रस्टच्या या सामाजिक कार्याचा यामाध्यमातून छोटासा भाग होऊ शकलो.
पापासॉर्ण मिपा या साध्या पत्र्याच्या घरात वास्तव्यास होत्या. मात्र, गणरायाच्या कृपेने आज त्यांची फुकेत मधील यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख आहे. फुकेत 9 रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी ही त्यांची कंपनी आहे. गणरायाच्या कृपेने त्यांना यश मिळाल्याने त्या फुकेत येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासारखे मंदिर उभारत आहेत.
बांधकाम क्षेत्रात त्यांना मिळालेले यश हे दगडूशेठ गणेशामुळेच मिळाले, असल्याची भावना त्यांनी पुण्यात व्यक्त केली. थायलंडहून अनेकांना पुण्यात दर्शनासाठी येण्याची इच्छा आहे, मात्र अंतर खूप असल्याने शक्य होत नाही. याकरिता मी फुकेत येथे मंदिर उभारत आहे, असे त्यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत भारती हॉस्पीटल रिसर्च सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जय गणेश प्रांगण येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 378 लोकांनी वैद्यकिय सुविधेचा लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदविला यातून 113 लोकांच्या विविध शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहेत. तसेच या आरोग्य शिबिरामध्ये आयुष्य भारत योजनेचे गोल्डन कार्ड 92 लोकांना मोफत स्वरुपात काढून देण्यात आले. तसेच रुग्णसेवा अभियान अंतर्गत लायन्स क्लब आॅफ कात्रज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगर कात्रज कोंढवा रोड भागातील 68 नेत्र रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या वतीने यशस्वीरीत्या करून देण्यात आली. यावेळी लायन्स क्लबचे विठ्ठल वरुडे यांनी संस्थेस बहुमोल सहकार्य केले.