मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही अनेक जण मास्क घालताना दिसत नाहीत. अनेक जण मास्क गळ्याशी लावूनच असतात. पण तोंड आणि नाक झाकले जाईल, अशा पद्धतीने मास्क घालत नाही.
पण तुम्हाला माहित आहे का, मास्क न घालणारा एक माणूस ४०० लोकांना संक्रमित करू शकतो. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनीच ही माहिती दिली आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांच्या मनातली कोरोनाची भीती दूर झालेली. त्यामुळे बरेच जण मास्क घालायला टाळाटाळ करत आहेत.
पण मास्क न घालण्याचा बेफिकीरीपणा एका-दुसऱ्याच्या नाही तर तब्बल ४०० जणांच्या जिवावर बेतू शकतो. डॉ. संजय ओक यांनी असेही म्हटले आहे की, विनामास्क फिरणाऱ्या लोकांना त्यांच्या बाजूने जाणाऱ्या लोकांनी रोखले पाहिजे, आणि त्यां मास्क लावण्याची विनंती केली पाहिजे. लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डॉ.संजय ओक यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टर, आरोग्य यंत्रणा झटतेय, पण सगळे काही डॉक्टर करतील आणि आम्ही बेजबाबदारपणे वागू, असा विचार केला तर हा आजार आपल्यातून कधीच जाणार नाही, असंही डॉ. संजय ओक म्हणालेत.
याबाबत आम्ही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही विचारले. त्यावर ते म्हणालेत की, 'एकामुळे ४०० लोकांना कोरोना होतो, असं ठामपणे सांगता येणार नाही, पण काही तज्ज्ञांनी तसे निरीक्षण नोंदवले असेल. संख्येवर न जाता लोकांनी मास्क वापरला पाहिजे'