प्रताप नाईक, कोल्हापूर झी 24 तास : जोतिबाच्या नावानं चांगभलं! दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी एक टन वजनाची घंटा अर्पण करण्यात येणार आहे. ही घंटा पंचधातूनपासून तयार करण्यात आली आहे . ही भली मोठी घंटा मंदिर परिसरात बसवली जाणार आहे.
सांगलीच्या भक्ताने अर्पण केलेली ही घंटा पाहाता क्षणी नजरेत भरणारी आहे. पंचधातूपासून तयार करण्यात आलेली ही घंटा तब्बल पावणे चार फूट इतकी उंच आहे. तर रुंदी 40 इंच इतकी आहे. घंटेचं वजन 1 टन आहे. ही घंटा पंचधातूची बनवण्यात आल्यामुळे याचा आवाज दूरपर्यंत भाविकांना ऐकू येईल, अशी भक्तांची धारणा आहे.
सर्जेराव नलवडे जोतिबाचे भक्त आहेत. ते दर रविवारी कोल्हापूरला येतात आणि देव जोतिबाचे दर्शन घेतात. नलवडे यांच्याकडून 2000 साली जोतिबा चरणी एक भली मोठी घंटा अर्पण करण्यात आली होती. मात्र कालांतराने या घंटेला तडे गेले. त्यामुळे त्यांनी नवी घंटा तयार करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही घंटा पंचधातूची तयार करण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार त्यांनी पलुस इथल्या केदार मेटल फाउंड्रीमध्ये या महाघंटेचे काम सुरू केलं.
महाघंटेचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. 27 मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता जोतिबा डोंगरावरील देवबावी तलावाच्या पश्चिम बाजुला ही घंटा बसवली जाणार आहे. देवाच्या चरणी आपली महाघंटा असावी, अशी इच्छा सर्जेराव हिंदुराव नलवडे यांनी व्यक्त केली आहे.