Nashik News: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याच्या शेतात अचानक एक अवकाशातून एक विचित्र वस्तु पडली. यामुळं परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. तसंच, ग्रामस्थांमध्येही घबराट निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. यामुळं आजूबाजूच्या गावातही मोठी खळबळ उडाली आहे.
येवला तालुक्यातील अंदरसुल येथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास डॉ. हरीश रोकडे यांच्या शेतात कोरियन बनावटीचे एक शास्त्रीय उपकरण पडताना काही शेतकऱ्यांनी पाहिलं होतं. तसंच, या उपकराणातून लाल रंगाचा प्रकाश आणि भयंकर असा अवाज येत होता. हे पाहून परिसरातील शेतकरी रोकडे यांच्या शेतात जमा झाले होते. शेतात यंत्र कोसळल्यानंतर हा आवाज यायचा बंद झाला होता.
शेतात यंत्र कोसळल्यानंतर हा आवाज बंद झाल्याने शेतकरी रोकडे यांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्या यंत्रावर कोरियन भाषेत काहीतरी मजकूर लिहिलेला असल्याचे आढळला. त्यामुळं हे यंत्र कोरियाचे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती स्थानिक तलाठी कमलेश पाटील यांना देण्यात आली आहे. यानंतर पाटील यांनी पाहणी केल्यानंतर तहसीलदार आबा महाजन तथा तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी याची दखल घेत घटनास्थळी भेट दिली आहे.
मात्र आकाशातून ही वस्तु थेट शेतात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या ही नेमकी काय वस्तू आहे आणि अवकाशातून कशी पडली याचा शोध घेतला जात आहे. तसंच, ग्रामस्थांना सुरुवातीला आकाशातून एलियन आलेत की काय, असे तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र, तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही वस्तु एखाद्या यानाचा किंवा यंत्राचा भाग असू शकतो, असं म्हटलं आहे. मात्र, या घटनेमुळं परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.