Maharashtra Minister Chandrakant Patil : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानंतर शनिवारी त्यांच्यावर शाईफेक (Ink Attack) करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. या वक्तव्यानंतर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करण्यास तयार आहोत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. मात्र आता याप्रकरणी 8 शिपाई आणि 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये एका कार्यक्रमाला आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर काल शाईफेक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. आता या घटनेचे पडसाद पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात उमटलेत. या घटनेनंतर 8 पोलिस कर्मचारी आणि 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेत. चोख बंदोबस्त असताना ही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्याच्या 2 साथीदारांनी शाई फेकली. या घटनेनंतर अखेर 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहेत.
हे ही वाचा >> हिंमत असेल तर समोर या, चंद्रकांत पाटील यांचं ओपन चॅलेंज
नेमकं काय घडलं?
चंद्रकांत पाटील एका महोत्सवाच्या उद्घटनासाठी पिंपरीत आले होते. या दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर ही शाईफेक करण्यात आली. यावेळेस चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसंच पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत निदर्शनं करण्यात आली. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीसह तिघांना ताब्यात घेतलं.
चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतरही कारवाई
शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांवर कारवाई न करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही पोलिसांवरही कारवाई करण्यात आलीय. "पोलिसांना दोष देण्याचे कारण नाही. पोलिसांनी कुणाकुणावर लक्ष द्यायचे. कार्यकर्ता कोण आणि बदमाश कोण हे कळणार कसे? मी देवेंद्र फडणवीसांना सांगितले आहे की, कुणावरही कारवाई करु नका. मी सर्व कार्यक्रमाला जाणार आहे," असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
हे ही वाचा >> Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात...
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
"सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते. 10 कोटी देणार लोक आहेत ना", असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.