नाशिक विभागातील ५ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन बंद

नाशिक विभागातल्या पाच जिल्ह्याचं मिळून असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महत्त्वाच्या उपचार यंत्रणाच बंद पडल्या आहेत.

Jaywant Patil Updated: Mar 29, 2018, 09:32 PM IST
नाशिक विभागातील ५ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन बंद title=

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक विभागातल्या पाच जिल्ह्याचं मिळून असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महत्त्वाच्या उपचार यंत्रणाच बंद पडल्या आहेत. सिटी स्कॅन मशीन बंद पडलंय. डायलिसीस सेंटर अखेरच्या घटका मोजतंय. एवढंच नाही तर अतिदक्षता विभागातला एसी 15 ते 20 दिवसांपासून बंद पडला आहे. आयसीयू हा प्रकार एसी असतो. मात्र इथे रूग्णासमोर लावलेला पंखा पाहून तुम्हाला धक्का बसेल. ही दृष्यच पुरेशी बोलकी आहेत नाशिकच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थिती सांगायला. उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यासाठी हे संदर्भ रूग्णालय मोठा आधार. मात्र आता हे रूग्णालयच व्हेंटीलेटरवर आहे. महत्त्वाच्या सर्व यंत्रणा मोडकळीला आल्या आहेत. सिटीस्कॅन मशीन बंद पडलं आहे. डायलिसीस मशीन अखेरच्या घटका मोजतंय. आयसीयूतला एसी बंद आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रूग्णांनी घरून पंखे आणलेत. हॉस्पिटलची लिफ्ट बंद आहे. त्यामुळे इमर्जंन्सीसाठी दाखल झालेल्या रूग्णाला झोळी करून संबंधित वॉर्डात नेलं जातं आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष

विशिष्ट तापमानाच्या अभावी लाखो रूपये किंमतीची यंत्रणा नादुरूस्त होते. सुपर स्पेशालिटीबाबत खर्चाचे हेड्स आणि पदाबाबत विशेष मान्यता न मिळाल्याने उसनवारीवर काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष आणि शासनाने रखडवलेला निधी यामुळेच रूग्णालयाची दूरवस्था झालीय. 

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचं पालकत्व असलेल्या नाशिक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची ही अवस्था असेल तर इथल्या आरोग्य यंत्रणेचे काय तीन तेरा उडाले असावेत याची कल्पना येईल. आता मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्या नाशिकमधल्या रूग्णांसाठी मुख्यमंत्री पालकत्वाच्या भूमिकेतून काय उपाययोजना करतील?