दिवसाला ५ जण करतायेत घराचा त्याग....

आर्थिक मानसिक ताणतणाव, नैराश्य आणि नाराजीमुळे अनेक जण हतबल

Updated: Dec 29, 2022, 05:40 PM IST
दिवसाला ५ जण करतायेत घराचा त्याग.... title=
प्रतीकात्मक छायाचित्र

सोनू भिडे, नाशिक:-  कौटुंबिक वाद, सामाजिक, आर्थिक कमी, प्रेमप्रकरण या समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतो. यामुळे तो नैराश्यात आणि नाराज असतो. या परिस्थितीत तो काय करतो याकडे त्याचे लक्ष नसते. यात नैराश्यात गेलेला व्यक्ती आत्महत्या तसेच घर सुद्धा सोडून जातो. नाशिक शहरातील पोलीस ठाण्यात घर सोडून गेलेल्यांची नोद केली जाते. यात गेल्या वर्षी पेक्षा चालू वर्षात घर सोडून जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.   

गेल्या वर्षी अठरा वर्षावरील १,४१५ नागरिक नातलगांना कोणतीही पुर्वकल्पना न देता घर सोडून गेले होते. तर चालू वर्षात १,७४१ नागरिक घर सोडून गेल्याची नोंद नाशिक मधील विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. शहरातील अंबड पोलीस ठाण्यात सर्वाधिक नागरिक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. घर सोडून गेलेल्या नागरिकांपैकी अनेक नागरिक घरी परतले आहे तर काही नागरिक अद्याप बेपत्ता असल्याच पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. 

हे आहे कारण    

नाशिक शहर हद्दीत एक जानेवारी २०२२ ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत १८ वर्षावरील वयोगटातील १,७४१ नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात घर सोडून जाणाऱ्यांमध्ये नाराजी किंवा नैराश्य असल्याचे आढळून आले आहे. कौटुंबिक वाद, नोकरी किंवा व्यवसायातील अस्थिरतेमुळे आलेलं आर्थिक संकट, अनैतिक संबंध, प्रेमसंबंध या कारणामुळे नैराश्य येऊन नागरिक घर सोडून जात असल्याच पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. 

काही नागरिक बेपत्ता 

नैराश्येत घर सोडून निघून गेलेल्या व्यक्तीं ठराविक वेळेनंतर घरी परततात मात्र यातील काहींचा घातपात सुद्धा होतो. यात अपघात होणे, खून होणे किंवा नैराश्येत आत्महत्या करून घेणे अश्या सुद्धा घटना घडल्या आहेत.