मोबाईल गेमींग द्वारे 400 जणांचे धर्मांतर; मुंब्रा येथील मुख्य आरोपीला अलिबागममधून अटक

गेमिंग जिहादचा मास्टरमाईंड शहानवाजला अलिबागच्या लॉजवरुन अटक. मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई.

वनिता कांबळे | Updated: Jun 11, 2023, 06:50 PM IST
मोबाईल गेमींग द्वारे 400 जणांचे धर्मांतर; मुंब्रा येथील मुख्य आरोपीला अलिबागममधून अटक title=

Religious Conversion Case :  गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडालेय. या ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे धागेसोरे ठाण्यातील मुंब्रा पर्यंत पोहचले. मोबाईल गेमींग जिहादप्रकरणातील आरोपी शहानवाजला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. अलिबागच्या एका लॉजमधून शहानवाजला अटक करण्यात आली आहे. 

मुंबईच्या वरळीतून अलिबागला पळाला होता

400 जणांच्या धर्मांतर प्रकरणातील शहानवाज मुख्य आरोपी आहे. मुंबईच्या वरळीतून शहानवाज अलिबागमध्ये पळाल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली, त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला अटक केली. उत्तरप्रदेश पोलिसही शहानवाजच्या मागावर होते.

मुंब्रा भागात तब्बल 400 जणांचं धर्मांतर झाल्याचा दावा

ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात धक्कादायक वास्तव समोर आले. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अल्पवयीन मुलाला मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर त्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील मुंब्रा भागापर्यंत पोहोचल्याचं आढळलं. गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये मुंब्रा भागात तब्बल 400 जणांचं धर्मांतर झाल्याचा उल्लेख असल्यानं पोलीसही चक्रावून गेलेत.आतापर्यंत पाच अल्पवयीन मुलांनी मुस्लीम धर्मांतर केल्याची उदाहरणं आहेत. याप्रकरणी एका मौलवीला अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी शहनवाज याचा पोलिस शोध घेत होते. अखेरीस तो पोलिसांच्या हाती लागला आहे. 

वसईतही धर्मांतराचे प्रकरण

ऑनलाईन गेम धर्मांतरण प्रकरणाचे उत्तर प्रदेशातले धागेदोरे मुंब्र्यापर्यंत पोहचल्यानंतर वसईतलं एक प्रकरणही समोर आले. वसईच्या जानी परिवारातील सदस्य राजेश जानी यांना देखील धर्मांतराच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. राजेश जानींना महमूद रियाझ बनवल्यानंतर धर्मांतरासाठी आपल्यावर दबाव आणला जातोय असा आरोपही त्यांनी केलाय. 

मुंब्रा धर्मांतर प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना चॅलेंज

मुंब्रा धर्मांतर प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. 400 लोकांपैकी 4 लोकांची नावं तरी दाखवा आमदारकीचा राजीनामा देईल असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी म्हंटलंय. निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी कोणत्याही थराला जाऊ शकतात असा आरोप करत 1 जुलैला मुंब्रा बंद करण्याचा इशारा आव्हाडांनी दिलाय. 

असं उघडकीस आले धर्मांतराचे प्रकरण

गाझियाबादमधल्या 17 वर्षांच्या जैन धर्मीय मुलानं गुपचूप इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्याच्या घरच्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. गाझियाबादच्या सेक्टर 23 मधल्या याच मशिदीत हा तरुण लपून छपून नमाज पढायला जायचा. हा मुलगा 5 वेळा जीमला जाण्याच्या बहाण्यानं गायब असायचा कुटुंबीयांनी चौकशी केली तेव्हा तो मशिदीला नमाज पढायला जात असल्याचं निदर्शनास आले. यानंतर जे सत्य समोर आले त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.   मुस्लीम धर्म स्वीकारल्याची कबुली मुलाने दिली. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिस तक्रार केल्यानंतर ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.