विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मराठवाड्याच्या वाटेला 3 मंत्रिपदं आली आहेत. त्यात शिवसेनेनं दोघांना तर भाजपनं एकाला संधी दिली. आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून, पक्ष विस्ताराचा विचार करूनच या निवडी कऱण्यात आल्या आहेत, तरी यामुळं शिवसेनेचा एक गट मात्र नाराजही होवू शकतो याचाही शिवसेनेनं विचार कऱण्याची गरज आहे. स्थानिक समिकरणाचा विचार करूनच मंत्रीपदांच वाटप झालं असं निश्चितपणे म्हणता येईल त्याचं कारणंही तसंच आहे नावांचा विचार करता शिवसेनेनं बीडमधून जयदत्त क्षिरसागर यांना कँबिनेट मंत्रीपद दिलंय. तर मुळचे सोलापुरचे मात्र आता उस्मानाबादेत जम बसवलेल्या तानाजी सावंतांनाही मंत्रीपद दिलंय. तर भाजपनं पहिल्यांदाच आमदार झालेल्या अतुल सावेंच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घातली आहे.
यांनाच का मिळालं मंत्रीपद ?
एकेकाळी बीडमध्ये भाजपचा मोठा भाऊ असलेलं शिवसेना आता बीडमधून पुर्णँत: गायबच झाल्याचं चिन्ह आहे. त्यामुळं शिवसेनेला जिल्ह्यात पुन्हा मुसंडी मारण्यासाठी एका मोठ्या नेत्याची गरज होती, जयदत्त क्षिरसागराच्या रुपानं शिवसेनेचा हा शोध पुर्ण झालाय.. क्षिरसागर एक मास लिडर आहेत. जिल्ह्यावर त्यांची पकड आहे. भाजप असो वा राष्ट्रवादी काँग्रेस यांना तगडा मुकाबला देण्याची ताकद क्षिरसागर यांच्यात आहे. क्षिरसागरांच्या माध्यमातून शिवसेनेला पक्षविस्ताराचीही मोठी संधी आहे, त्यामुळं क्षीरसागरांना मंत्रीपद आणि शिवसेनेला ताकत नसलेल्या जिल्ह्यात मोठा नेता हे समिकरणं पुर्ण झालंय..
सावेंना मंत्रीपद म्हणजे शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्नही आपण म्हणू शकतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांत सावेंच्या मतदारसंघातून शिवसेनेला मोठं बळ मिळालं नाही. त्यात खैरैंचा पराभवही झाला मात्र या ठिकाणी एमआयएमची वाढ झालीये. या एमआयएम वंचीत आघाडीला शह देण्यासाठीच सावेंना मंत्रिपद देण्यात आलं आणि खास करून मुस्लिमांना जवळची असलेली अल्पसंख्यांक आणि वक्फ बोर्डाची खातीही त्यांना देण्यात आली. खैरैंचा पराभव झाल्यानंतर नेतृत्वाची पोकळी सुद्धा निर्माण झाली आहे. सावेंच्या माध्यमातून ती भरून काढण्याचा आणि शिवसेनेवर वरचढ ठऱण्याचाही प्रयत्न भाजप यातून करतंय. आगामी विधानसभा आणि नंतर होणारी महापालिका निवडणूक या सगळ्यांचा विचार करून भाजपनं ही मोठी खेळी केल्याचं बोललं जातंय..
मुळचे सोलापुरचे असणारे सावंत गेली 2 वर्ष मराठवाड्यात तळ ठोकून आहे, सावतं यवतमाळ वाशिम मंतदारसंघातून विधानपरिषदेवर आहे, मात्र शिवसेनेनं त्यांना उस्मानाबादचं संपर्कप्रमुख म्हणून नेमलं त्याचाच फायदा घेत सावतांनी संघटना बळकट केली, रविंद्र गायकवाड यांच खासदारकीचं तिकीट कापणं, ओमराजेंना तिकीट मिळवून देणं आणि त्यांना जिंकवून आणण्यातही सावंताचा मोठा वाटा आहे, त्यातुन जुने शिवसैनिक सावंताच्या जवळ नसले तरी नव्यांना घेवून त्यांनी मोठ बांधली आणि राष्ट्रवादीच्या पद्मसिंह पाटल्यांच्या साम्राज्याला तडा देणारा म्हणून त्यांची ओळख झाली याच माध्यमातून उस्मानाबादेत विस्तारांसाठी शिवसेनेनं सावंतांना संधी दिल्याचं बोललं जातंय.
ही सगळं मिळालेली मंत्रीपद पाहता शिवसेना आणि भाजप दोघेही एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करीत असल्याचं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल, सोबतच आगामी विधानसभा निवडणूका पाहता दोन्ही पक्ष कसा स्वताचा विस्तार करू शकतात याचेही प्रयत्न शिवसेना भाजपनं सुरु केले आहेत. शिवसेनेनं दुस-या पक्षातून आलेल्या नेत्यांना संधी दिल्यामुळं जुने शिवसैनिक मात्र नाराज आहे. शपथविधी कार्यक्रमाला, शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाठ आणि सांदिपना भुमरे या आमदरांनी नाराजी दर्शवीत दांडी मारली, त्यामुळं नव्यानां संधी आणि जुन्यांना काहीच नाही असं चित्र मराठवाड्यातील शिवसेनेत पहायला मिळंतय.
याचा फटका शिवसेनेला विधानसभेतही बसू शकतो, आयात केलेल्या उमेदवारांना मंत्रीपद आणि जुन्यां निष्ठावंताच्या तोंडाला पुसलेली पानं हे शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकतो, आता पक्ष विस्ताराचा विचार करतांना निष्ठावंतांची नाराजी दुर कऱणं हे सुद्धा मोठं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.हा सगळा राजकारणाचा खेळ पाहता, मराठवाड्याला मंत्रीपद मिळाली हे मात्र निश्चित आता या माध्यातून मराठवाड्याच्या नशिबी नक्की काही येतं का की फक्त ही पद सोयिस्कर राजकारणासाठी राहतील हेच पाहणं महत्वाचं ठऱणार आहे.