'3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर...'; राज ठाकरे संतापले

24 Died In 24 Hours Nanded Government Hospital: थेट शिंदे सरकावर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. तर राहुल गांधींनी भाजपाचा उल्लेख केला आहे. सुप्रिया सुळेंनी 'आपलं बोलून मोकळं व्हायचं' असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 3, 2023, 09:42 AM IST
'3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर...'; राज ठाकरे संतापले title=
राज ठाकरेंबरोबरच अनेक नेत्यांनी व्यक्त केला संताप

24 Died In 24 Hours Nanded Government Hospital: नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधींनी या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घडलेल्या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही घटना उघडकीस आली त्या दिवशीस सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे.

राज ठाकरे संतापले

"नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय असं कळतंय आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत," असं राज यांनी म्हटलं आहे. 

शिंदे सरकावर राज ठाकरेंचा निशाणा

राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही निशाणा साधला आहे. "3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय?" असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.  "दुर्दैव असं की सरकारमधले 3 पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं," असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राहुल गांधींनी थेट भाजपाचा उल्लेख करत साधला निशाणा

राहुल गांधींनीही या प्रकरणावरुन थेट भाजपाचा उल्लेख करत टीका केली आहे. "महाराष्ट्रातील नांदेड येथील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांच्या तुटवड्यामुळे 12 चिमुकल्यांसहीत 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी फारच खेदजनक आहे. सर्व मृतांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. भाजपा सरकार हजारो कोटी रुपये आपल्या प्रचारासाठी खर्च करते. मात्र लहान मुलांच्या औषधांसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. भाजपाच्या लेखी गरीबांच्या जीवाला काहीच किंमत नाही," असं राहुल यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन म्हटलं आहे.

शरद पवारांनीही केली टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, "नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे.  दोनच महिन्यांपूर्वी ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत 18 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेला गांभीर्याने न घेतल्यानेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अशाप्रकारच्या एका अत्यंत गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाली. यातून सरकारी यंत्रणांचे अपयश स्पष्ट होते. किमान वेळीच या दुर्दैवी घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि निष्पाप रुग्णांचा जीव वाचला जाईल यासाठी ठोस पावले उचलली जावीत याकडे राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे," असं म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंचंही ट्वीट

"असंवेदनशील सरकारचा 'आपलं बोलून मोकळं व्हायचं' हा दृष्टिकोन राज्याच्या हिताचा नाही. राज्यातील आरोग्यव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. ठाण्यातील रुग्णालयात 18 रुग्णांचा एका दिवसात मृत्यू झाल्यानंतर आता विष्णुपुरी, नांदेड येथे एकाच दिवसात 24 जण दगावले आहेत. औषधे वेळेवर न मिळाल्याने किंवा उपलब्धच नसल्याने हे मृत्यू झाले असल्याचे पिडितांचे नातेवाईक सांगतात," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. "रूग्णालयात औषधांचा मुबलक साठा असावा. श्वानदंश तथा सर्पदंशावरील औषधे उपलब्ध असावी अशी मागणी मी वारंवार केली आहे. तरीही राज्यातील बहुतेक शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा असल्याचे आणि डॉक्टर्स उपलब्ध नसल्याचे माध्यमातून आलेल्या बातम्यांतून तसेच नागरीकांच्या तक्रारीवरुन दिसते. याचा अर्थ राज्यकर्त्यांचे नागरीकांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष नाही. नागरिकांच्या किमान हितासाठी त्यांनी काम करणे आवश्यक आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यूमुळे या सरकारला वेदना होत नसतील तर हि बेसिकातच गफलत म्हणावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. या घटनांची निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला हवी. कारण राज्यकर्त्यांना निवडून देणाऱ्या मायबाप जनतेचे जीव एवढे स्वस्त नक्कीच नाहीत," अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.

नक्की घडलंय काय?

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात सर्पदंश आणि विषबाधेमुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.