गुजरात मॉडेलच्या नादात पुण्यातील 22 हजार 150 झाडांवर पडणार कुऱ्हाड! धक्कादायक माहिती उघड

Pune 22150 Trees Cut Down: पुणे महानगरपालिकेनेच पहिल्यांदा थेट आकडेवारीसहीत यासंदर्भातील कुबली दिली आहे. आधीपासूनच या प्रकल्पावरुन वाद सुरु असतानाच आता ही आकडेवारी समोर आल्याने पर्यावरण प्रेमींकडून संपात व्यक्त होत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 26, 2024, 10:20 AM IST
गुजरात मॉडेलच्या नादात पुण्यातील 22 हजार 150 झाडांवर पडणार कुऱ्हाड! धक्कादायक माहिती उघड title=
पालिकेनेच सांगितला आकडा (फाइल फोटो, सौजन्य - पीटीआय)

Pune 22150 Trees Cut Down: दिवसोंदिवस शहरीकरण वाढत असलेल्या पुणे शहरामधील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाणार आहे. पुणेकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत असून मुळा-मुठा नदीच्या हरित पट्ट्यातील 22 हजार 150 झाडे बाधित होणार आहेत. मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेंतर्गत नव्याने पर्यावरणीय मंजुरी मिळविण्यासाठी महापालिकेने राज्य पर्यावरण मूल्यांकन प्रभाव परिणाम प्राधिकरणाला सादर केलेल्या सुधारित अहवालात यासंदर्भातील उल्लेख करण्यात आला आहे. एकूण बाधित होणाऱ्या 22 हजार 150 झाडांपैकी 11 हजार 150 वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे. एकूण 30 हजार झाडांचं वृक्षारोपण केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या पुनर्रोपणाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने हरित पट्ट्यातील 22 हजार 150 झाडांवर कुऱ्हाड पडण्याची दाट शक्यता आहे.

गुजरात कनेक्शन

गुजरातमधील साबरमती नदीच्या किनाऱ्यावरील सुशोभिकरणाप्रमाणे मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजना महापालिकेने हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत 5 हजार कोटींची कामे करण्यात येणार आहेत. 44 किलोमीटर लांबीच्या नदीपात्रामध्ये एकूण 8 टप्प्यांत ही कामे केली जाणार आहेत. यातील 3 टप्प्यांची कामे सध्या सुरू असली तरी या महत्त्वाकांक्षी योजनेला पुण्यातील पर्यावरणप्रेमी आणि संस्था, संघटनांनी आक्षेप घेतलेत. या आक्षेपांसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) याचिकाही दाखल करण्यात आली.

पर्यावरणप्रेमीचा अर्ज

एनजीटीच्या आदेशानंतरही 3 टप्प्यांतील कामांची निविदा महापालिकाने काढली होती. त्या विरोधात सारंग यादवाडकर या पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्याने एनजीटीमध्ये धाव घेतल्यानंतर योजनेच्या कामासाठी सुधारित पर्यावरणीय मंजुरी घेण्याचे आदेश देण्यात आलेले. त्यानुसार महापालिकेनेच हरित पट्ट्यातील 22 हजार 150 झाडे बाधित होणार असल्याची कबुली दिली आहे.

आधापासूनच विरोध

मुळा-मुठाच्या पात्रातील या योजनेचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच डीपीआर तयार करताना नदीपात्रातील झाडे तोडण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र पहिल्या टप्प्यातील कामे सुरू झाल्यानंतर 5 हजारांपेक्षा झाडे तोडण्यात येणार असल्याचे आणि त्याला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनेही मान्यता दिल्याची माहिती समोर आली. त्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी लढा सुरू केल्याने महापालिकेला सावध पवित्रा घेतला होता. बाधित झाडांऐवजी दुपटीने झाडे लावण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलं. मात्र महापालिकेने राज्य मूल्यांकन प्रभाव परिणाम प्राधिकरणाला दिलेल्या माहितीत हरितपट्ट्यातील एकूण 22 हजार 150 झाडे बाधित होणार असल्याचे सांगितले आहे. प्रथमच हरितपट्ट्यातील बाधित होणाऱ्या झाडांची आकडेवारी समोर आली आहे. 

उत्तर देण्याची तयारी

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीसंवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेला पर्यावरणीय मंजुरी नाकारण्यात आली आहे. राज्य मूल्यांकन प्रभाव परिणाम प्राधिकरणाने ही मंजुरी नाकारताना 8 मुद्द्यांवर महापालिकेकडे स्पष्टीकरण मागितले आहे. यासंदर्भात उत्तर देण्याची आणि नियोजन करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या कामाला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. 3 टप्प्यांतील कामे सुरूच राहतील आणि प्राधिकरणाने मागितलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात येईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला आहे.