Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या अनैतिक संबंधांमुळं वैतागलेल्या मुलानेच वडिलांची सुपारी देऊन हत्या घडवण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने मित्रालाच वडिलांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचेही समोर आले आहे. तर, दुसऱ्या एका घटनेत वडिल ओरडले म्हणून मुलाने त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडील नेहमी आईसोबत भांडत असल्याच्या रागातून 20 वर्षीय मुलानेच आपल्या वडिलांच्या हत्येची सुपारी देऊन त्यांना संपवले. नांदेड शहरात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. शेख युनूस शेख पाशा असं मयत व्यक्तीचं नाव आहे. ते खडकापुरा भागातील हॉटेल व्यावसायिक होते.
शेख युनूस शेख पाशा यांचे पत्नीशी नेहमी भांडण होत असे. तसंच, शेख युनूस यांच्या बाहेर एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळं त्यांच्यात सतत वादविवाद होत होता. या त्रासाला कंटाळून त्यांचा मुलगा शेख यासेर याने त्याच्या एका मित्राला वडिलांची हत्या करण्यासाठी 2 लाखांची सुपारी दिली. त्याच्या मित्राने मनमाड येथील दोघांना हत्येची सुपारी दिली. हॉटेल व्यावसायिक शेख युनूस यांचा मृतदेह त्यांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता.
पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि सायबर सेलच्या सहाय्याने या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. तेव्हा मुलानेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याची बाब समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
वडिल ओरडल्याने मुलाने केली हत्या
घरात बसण्याऐवजी काही कामधंदा कर, असे वडिलांनी सांगितल्यानंतर वडिलांच्या या बोलण्याचा राग डोक्यात धरून मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड टाकून निर्घुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील समोर आली आहे. खरगाव येथे ही घटना घडली असून वडिलांची हत्या करून मुलाने घटनास्थळावरून पोबारा केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर आरोपी मुलाच्या तपासासाठी देखील शोध पथक तैनात केले असून, लवकरात लवकर मारेकरी मुलाचा शोध लावून त्याच्या मुसक्या आवळण्यात येतील असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. बापू पांड्या कुवर असे मृत 53 वर्षीय वडिलांचे नाव असून ते शेती काम करत होते. तर विजय कुवर वय 25 असे मारेकरी मुलाचे नाव आहे. वडील जेवण करत असताना वडिलांच्या बोलण्याचा राग अनावर झाल्याने विजय कुवर याने संतापाच्या भरात थेट दगडच वडिलांच्या डोक्यात टाकून वडिलांची हत्या केली व त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात वडिलांना तसंच सोडून मुलाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.