प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात धोका उद्भवणार्या मिर्या बंधार्यासाठी महाराष्ट्र शासनाने 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळेच हा प्रश्न निकाली निघाला असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मागील काही वर्षांपासून मिर्या गावातील किनारी भागाला पावसाळ्यात समुद्री लाटांच्या तडाख्याला सामोरे जावे लागते आहे. दगडी धूपप्रतिबंधक बंधार्याला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. मिरकरवाडा आणि भगवती बंदरात उभारण्यात आलेल्या ब्रेक वॉटर वॉलमुळे जमिनीची धूप होण्याची ही समस्या निर्माण झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. या बंधार्याचे पक्के बांधकाम करावे, अशी मागणी सातत्याने येथील ग्रामस्थ करत आहेत.
"नव्याने उभारण्यात येणारा बंधारा साडेतीन किलोमीटरचा असेल. दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाणार्या बंधार्यावर कायमस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी टेट्रापॉड, रिटेनिंग वॉल, ब्रेकिंग वॉल यासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर करुन समुद्र धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात येणार असल्याचे यावेळी आ. उदय सामंत यांनी सांगितले. या कामाचे टेंडर लवकरच काढण्यात येणार असून पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होईल. यंदाच्या पावसाळ्यात या बंधार्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, येथील नागरिकांना चार महिने त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असेही ते म्हणाले.
बंधारा मंजूर झाला याचा आनंद आहेच मात्र त्याचं काम या पावसाळ्यापूर्वी सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र आता तरी यावर्षी पावसाळ्यात काही उपाय योजना करून हे काम तातडीने सुरू करणे गरजेचे असल्याचं मत स्थानिक ग्रामस्थ आप्पा वानरकर व्यक्त करतात.