बदलापुरात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी निघाला घरातीलच व्यक्ती

Badlapur Crime News: बदलापूर येथे पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 28, 2024, 09:22 AM IST
बदलापुरात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी निघाला घरातीलच व्यक्ती title=
16 year old girl allegedly raped by father in Maharashtras Badlapur

Badlapur Crime News: बदलापूर पुन्हा एकदा हादरले आहे. शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. तर, अत्याचार करणारा नराधम दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलीचा बापच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं परिसरात या नराधमाविरोधात एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत तीन ते चार वर्षांच्या चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. शाळेतीलच स्वच्छतागृहात सफाई कर्मचाऱ्याने चिमुरडींवर अत्याचार केल्याचं समोर आलं होतं. ही घटना उघडकीस आल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई केली होती. तसंच, शाळा प्रशासनानेही गंभीर दखल घेतली नव्हती. या घटनेमुळं बदलापुरात संताप व्यक्त होत होता. शाळेतील पालकांनी व नागरिकांनी शाळेविरोधात आंदोलन केले होते. तसंच, रेलरोको करत आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना बदलापूरात घडली आहे. 

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडित मुलीच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 54 वर्षीय आरोपी वारंवार पीडित मुलीवर अत्याचार करत होता. तसंच तिला मारहाणदेखील करत होता. 22 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पीडितेवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर ती घाबरून घरातून पळून गेली. मात्र, नंतर उशिराने ती रात्री घरी परतली. त्यानंतर सोमवारी तिने वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधम वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.