पुण्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, १० दिवसात ११ जणांची हत्या

पुण्यातली खुनाची ही सलग दहावी घटना

Updated: Jan 22, 2019, 05:07 PM IST
पुण्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, १० दिवसात ११ जणांची हत्या title=

नितीन पाटणकर, पुणे : सलग दहा दिवस पुण्यात रक्तरंजित थरार पाहायला मिळतो आहे. पुण्यातल्या ताडीवाला रस्ता भागात सकाळ उजडली ती खुनाच्या एका भयानक घटनेनं. कौटुंबिक वादातून आयाज शेख यानं पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा खून केला. यानंतर स्वतःवर ही त्याने वार केले. पुण्यातली खुनाची ही सलग दहावी घटना आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात नऊ दिवसांपासून दररोज एक खून होतो आहे. खूनांच्या या भयावह मालिकेत दहाव्या दिवशी दोन खून झाले आहेत. 

पुण्यात खुनाच्या 10 घटना

1. वारज्यात स्मशानभूमीजवळ अनोळखी तरुणाचा खून.
2. दुसर्या दिवशीच पैशांवरुन दहावीतल्या निखील आंग्रोळकरचा खून 
3. पर्वतीमधल्या जनता वसाहतीत गुंड निलेश वाडकरचा दुसऱ्या गुन्हेगार टोळीकडून खून. 
4. आंबेगावात व्यवसायिक रकीबचंद ओसवाल यांचा खंडणीसाठी खून.
5. कात्रजमधल्या नवीन बोगद्याजवळ खून
6. सिंहगड रस्त्यावर दारुसाठी पैसे मागितल्याने अल्पवयीन मुलांकडून एकाची हत्या 
7. कॅम्प परीसरात दारु पिण्यासाठी बाकड्यावर बसण्याच्या कारणावरून रफीक शेखचा खून.
8. फुरसुंगीमध्ये जुन्या भांडणातून मजुरांकडून मंगलसिंग माहुसिंग याचा खून.
9. हडपसरमध्ये पैशांच्या वादातून राहुल पाटीलचा मित्रांकडून खून. 
10. आणि दहाव्या दिवशी पतीकडून पत्नी आणि मुलीचा खून

खुनांचे हे सत्र सुरु असतानाच, डेक्कन परीसरात वृद्ध दांम्पत्याला त्यांच्या राहत्या बंगल्यात काही तास ओलीस ठेऊन त्यांना लुटण्यात आलं. तर कोथरुडमध्ये दहा घरफोड्या झाल्या आहेत. सराईत तसंच तडीपार गुंडांकडे होणारं दुर्लक्ष, अवैध धंदे,  सुरवातीला किरकोळ गुन्ह्यांकडे होणारे दुर्लक्ष अशा कारणांमुळं पुण्यात गुन्हेगारी फोफावल्याचं बोललं जातं आहे. पण त्याची मुख्य जबाबदारी ही पोलिसांची आहे.