अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये सर्रास जेवण पॅक करताय, आरोग्यासाठी आहे खूपच घातक, कारण जाणून घ्या

Why Medicines Packed In Aluminium Foil: अॅल्युमिनियम फॉइलचा वापर हल्ली खूप केला जातो. पण तुम्हाला माहितीये का अॅल्युमिनियमचा अतिप्रमाणात वापर तुमच्यासाठी घातक ठरतो.

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 14, 2024, 03:52 PM IST
अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये सर्रास जेवण पॅक करताय, आरोग्यासाठी आहे खूपच घातक, कारण जाणून घ्या title=
why using aluminium foil can be harmful for your health

Why Medicines Packed In Aluminium Foil: आजच्या काळात अॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. पदार्थ गरम राहण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून देण्यात येतो. मात्र, अॅल्युमिनियचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक ठरतो, असं तज्ज्ञांचे मत आहे. पण खरंच अॅल्युमिनियम फॉइल आरोग्यासाठी घातक आहे का? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. हे सविस्तर जाणून घेऊया. 

अन्न जास्त काळ ताजे व पदार्थ गरम राहावा म्हणून हल्ली सर्रास अॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. मुलांनाही डब्बा देताना पोळ्या अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून दिल्या जातात. मात्र, हा पर्याय जितका सोप्पा व सहज आहे तितका मात्र तो सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. अॅल्युमिनियम फॉइलचा वापर अतिप्रमाणात करण्याचे अनेक तोटे तज्ज्ञांनी नमूद केले आहेत. 

काही पदार्थांमध्ये आधीपासूनच अॅल्युमिनियम असते. फळे, भाज्या, मांस, मासे,धान्य आणि दह्यात अॅल्युमिनियम असते. यासोबतच चहाची पाने, मशरुम, पालक, मुळायामध्येही काही प्रमाणात अॅल्युमिनियम असते. पण आपल्या शरीरातून हे अॅल्युमिनियम बाहेर टाकून दिले जाते. पण जेव्हा अॅल्युमिनियम फॉइल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अतिरिक्त अॅल्युमिनियम शरीरात जात असते. त्यामुळं शरीराचे खूप नुकसान होत असते. शरीरात अॅल्युमिनियम गेल्यामुळं मेंदूला नुकसान होते. अल्झायमर नावाचा आजार होण्याचाही धोका वाढतो. यामध्ये मेंदूच्या पेशी कमी होतात आणि हळूहळू स्मरणशक्ती कमी होत जाते. अॅल्युमिनियम हे प्रमुख कारण मानले जाते. 

अनेकदा गरम अन्न अॅल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक केले जाते. पण अन्नाच्या उष्णतेमुळं अॅल्युमिनियम वितळते आणि आपल्या अन्नात मिसळते. तसंच, अनेकदा अन्न शिजवताना थेट अॅल्युमिनियम फॉइलमध्ये टाकूनच ओव्हनमध्ये टाकता तेव्हा अन्नाबरोबरच अॅल्युमिनियम फॉइलही वितळते आणि त्याचे हानिकारक घटन पदार्थात मिसळले जातात. 

अॅल्युमिनियम फॉइलमध्ये आल्मयुक्त फळे पॅक करणे टाळा. अ‍ॅल्युमिनियमसह हे आम्ल अन्न विषारी बनवू शकते. संत्री, लिंबू, किवी, असे पदार्थ पॅक करु नका. तसंच, अॅल्युमिनियम फॉइल अन्नात ऑक्सिजन जाण्यापासून रोखण्यास सक्षम नाही. हे अन्नात बॅक्टेरिया वाढू देते. त्यामुळं यामध्ये साठवलेले अन्न दुसऱ्या दिवशी किंवा लवकर खराब होऊ शकते. अॅल्युमिनियम फॉइल आणि प्लास्टिकमध्ये अन्न साठवण्याऐवजी काचेच्या डब्यात अन्न साठवा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)