South Goa Tourist Places: गोवा नाव ऐकलं तरी मन प्रसन्न होते. निळाशार समुद्र, निसर्गरम्य वातावरण यामुळं गोव्यात नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. ख्रिसमस आणि न्यु इअर सेलिब्रेशनसाठी तर गोवा गर्दीने फुललेला असतो. पार्टी, क्रुझ आणि समुद्रकिनारे यासाठी गोवा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरत आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या गोव्यात जाण्यासाठी कित्येक दिवसांआधीच प्लान आखायला सुरुवात करतात. या व्यतिरिक्त गोव्यातील किल्लेदेखील खूप सुंदर आहेत. समुद्र किनाऱ्याव्यतिरिक्त गोव्यातील अनेक ठिकाणं अद्याप लोकांना माहितीच नाहीयेत. आज आम्ही तुम्हाला गोव्यातील हिडन प्लेसबद्दल सांगणार आहोत. भगवान रामाचं या ठिकाणी वास्तव्य होतं असं सांगितले जाते.
गोवा हे राज्य फार मोठं नसलं तरी विविधतेने नटलेले आहे. संपूर्ण गोवा आणि गोव्याची संस्कृती व खाद्यसंस्कृती जाणून घेण्यासाठी आठवडाभर तरी फिरावं लागतं. तसं बघायला गेलं तर गोवा दोन भागात विभागले गेले आहे. उत्तर गोवा (North Goa) आणि दक्षिण गोवा (South Goa). त्यामुळं तुम्ही देखील गोव्याला जायचा प्लान आखताय तर आधी यापैकी कोणत्या ठिकाणी तुम्हाला फिरायला जायचं आहे याचे नियोजन आधीच करा. उत्तर गोव्यात फिरण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्या भागात पार्टी, नाइटलाइफ आणि चर्च हे पर्यटकांना आकर्षित करतात. तर, साऊथ गोवा म्हणजेच दक्षिण गोव्यात शांत समुद्रकिनारे आणि निसर्ग यांचा सुंदर अनुभव तुम्ही घेऊ शकतात. दक्षिण गोव्यात असलेले असंच एक प्राचीन ठिकाण आहे ज्याचा थेट रामायणाशी संबंध आहे. तर, प्रेक्षणीय स्थळ म्हणूनही खूप लोकप्रिय आहे. मात्र, त्याचा इतिहास फार कमी जणांना माहितीये. या स्थळाचे नावही भगवान रामाच्या नावाने आहे. तर जाणून घेऊया या प्राचीन स्थळाविषयी.
गोव्याच्या दक्षिणेकडे एक प्राचीन ठिकाण आहे. अनेकांना या ठिकाणाबाबत माहिती नाहीये. जर तुम्ही गोव्याला जायचा प्लान करताय तर नक्की या ठिकाणाला भेट द्या. या ठिकाणाचे नाव काबो द रामा असं आहे. हा एक किल्ला असून अनेक घराण्यांनी या किल्ल्यावर राज्य केलं आहे. पण या किल्ल्याचा आणि रामाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना. या प्रश्नाचे उत्तर तर जाणून घेऊयात आधी या स्थळाच्या नावाचा अर्थ काय होतो जाणून घेऊयात. काबो द रामा याचा मराठीत अर्थ होतो रामाचे भूशीर. भूशीर म्हणजे समुद्रात शिरलेला जमिनीचा एक उंच भाग. या किल्ल्याचे मूळ नाव खोलगड असं आहे. अनेक घराण्यांकडे असलेला हा किल्ला 1763 साली पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला आणि त्याने नामकरण केले.
पोर्तुगीजांनी दक्षिण गोव्यात ख्रिश्ती धर्माचा प्रसार केल्यामुळं या किल्ल्यात चर्चदेखील आहे. या किल्ल्याची तटबंदी अद्यापही मजबूत आहे. तसंच, किल्ल्यावर दोन लांब पल्ल्याच्या तोफादेखील आहेत. किल्ल्याच्या पश्चिम दिशेला समुद्रात जाणारी एक छोटी घळ आहे तिथे एक गुहा आहे. या गुहेला रामाज केव्ह असं म्हणतात. इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की, भगवान राम वनवासात असताना रामाचे इथे वास्तव्य होते. त्यामुळंच या ठिकाणाला काबो द रामा असं नाव पडल्याचं म्हटलं जातं. इन्स्टाग्रामवर या ठिकाणाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. मराठी बॅकपॅकर गर्ल्स या अकाउंटवरुन या ठिकाणाची माहिती देण्यात आलेली आहे.