Side Effects Of Air Pollution: दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची अतिषबाजी आणि चमचमीत फराळ हा दिवाळीचा आनंद असतो. दिवाळीच्या दिवसांत संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असते. मात्र, याच दिवसांत फटाक्यांमुळं वायु प्रदुषणात वाढ होते. आरोग्यासाठी हे प्रदुषण खूप हानिकारक असते. खासकरुन वृद्ध व्यक्ती, लहान मुलं आणि गरोदर महिला यांना श्वासासंबंधीत काही आजार असतील तर त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
दिवाळीनंतर वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळं डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास, खोकला, थकवासारखी लक्षणे जाणवतात. तुम्हालादेखील अशी लक्षणे जाणवत असतील तर लगेचच हे उपाय करु पाहा.
डोळ्यांमध्ये जळजळ वाटत असेल तर सगळ्यात आधी थंड पाण्याने डोळे धुवा. यामुळं डोळ्यात साचलेली धुळ आणि प्रदुषणाचे कण निघून जाण्यास मदत होते आणि हळूहळू जळजळ कमी होते.
श्वास घेण्यात त्रास होत असेल तर गरम पाण्याने वाफ घ्या. यामुळं खोकला, सर्दी यांवरही आराम मिळेल. एका भांड्यात पाणी घेऊन ते गरम करुन घ्या. पाणी उकळत असताना त्यात तुळशीची पाने आणि मेथी टाका आणि वाफ घ्या.
घशात खरखर लागत असेल किंवा खोकला येत असेल तर गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. हा एक नैसर्गिक उपाय आहे यामुळं गळ्याची सूजदेखील कमी होते.
तुम्हाला खोकला आणि घशात खवखव जाणवत असेल तर आलं आणि मधाचे सेवन करा. त्यासाठी आल्याचा एक तुकडा कापून त्यात थोडं मध मिसळा आणि दोन ते तीनदा हे मिश्रण खा.
प्रदूषणाचा स्तर अधिक असेल तर अशावेळी बाहेर जाणे टाळा. गरज भासल्यास मास्क लावूनच बाहेर जा. यामुळं तुम्ही धुळ आणि प्रदूषणापासून तुमचा बचाव करु शकता.
या उपायांनीही जर आराम मिळत नसेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)