Lipstick : महिलांच्या सौंदर्यप्रसाधनांविषयी सांगावं तर, यामध्ये अनेत महिला फार काही गोष्टींचा वापर न करता फक्त मोजक्याच गोष्टी वापरतात. यामध्ये लिपस्टीक ही अनेकींच्याच आवडीची. चेहऱ्याला, त्वचेच्या वर्णाला साजेसा रंग ओठांवर लावून सौंदर्यात आणखी भर टाकण्यासाठी ही लिपस्टीक वापरली जाते. काहींना तर लिपस्टीकची इतकी सवय होते की ती न लावता या महिलांचा एक दिवसही जात नाही.
लिपस्टीकचे कैक ब्रँड, कैक प्रकार, रंग, आकार आणि इतकंच काय तर लिपस्टीकच्या तयार करण्याची प्रक्रियासुद्धा तितकीच वेगळी असते. लिपस्टीकचा मुख्य घटक असतो तो म्हणजे रंग. सौंदर्यप्रसाधनातील हा प्रकार तयार करत असताना अनेकदा त्यामध्ये माशांपासून निघणाऱ्या तेलाचा वापर केला जातो. यामध्ये शार्क लिवर अर्थात मोरी माशाचं तेल किंवा स्क्वेलिन आणि माशाच्या स्केल (गुआनिन) पासून तयार करण्यात आलेल्या काही घटकांचा समावेश असतो. यामुळं ओठांमधे बाष्प कायम राहून ते चमकदार राहण्यास मदत होते.
राहिला मुद्दा लिपस्टीकमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर असतो का, तर काही उत्पादनांमध्ये हा वापर केला जातो. मात्र हल्ली लिपस्टीकमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर कमी करण्यात आला असून, कैक सौंदर्यप्रसाधनं उत्पादक कंपन्या नैसर्गिक किंवा वनस्पतीजन्य स्निग्ध घटकांचा वापर लिपस्टीक तयार करण्यासाठी करतात.
काही वर्षांपूर्वी लिपस्टीक तयार करण्यासाठी जनावरांच्या चरबीसह त्यांच्या इतरही अवयवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. पण, आता मात्र या वापरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अनेक मोठ्या ब्रँडनी त्यांच्या उत्पादन निर्मितीपासून ते अगदी चाचणीपर्यंतही प्राण्यांचा किंवा त्यांच्यापासून मिळणाऱ्या कोणत्याही इतर उत्पादनाचा वापर करणं टाळलं आहे. जगातील अनेक मोठे ब्रँड सध्या व्हेजिटेरियन किंवा व्हिगन प्रोडक्ट तयार करण्यावर भर देत आहेत. सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन क्षेत्रातील हा बदल म्हणजे एक पर्यावरणपूरक क्रांतीच आहे असं म्हणणं गैर नाही.