'जेवण ऑर्डर करु नका...' Zomato कडून का करण्यात आली ही विनंती?

Zomato Food Delivery: ज्या झोमॅटोवरून हव्या त्या हॉटेलातून हवा तो पदार्थ मागवता येतो त्याच झोमॅटोकडून करण्यात आली ही अशी विनंती. काय आहे यामागचं कारण?  

सायली पाटील | Updated: Jun 3, 2024, 10:27 AM IST
'जेवण ऑर्डर करु नका...' Zomato कडून का करण्यात आली ही विनंती?  title=
Zomato Request to Customers latest updates based on heatwave reqest

Zomato Food Delivery: घरबसल्या हवं त्या ठिकाणहून, हवा तो पदार्थ ऑर्डर करण्याची मुभा झोमॅटोकडून देण्यात येते. जीभेचे चोचले पुरवणारं आणि पोटाची भूक भागवणारं हे अॅप अनेकांच्याच मोबाईलमध्ये पाहायला मिलतं. अशा या झोमॅटोकडून आता मात्र ग्राहकांना एक वेगळीच विनंती करण्यात आली आहे. काहींना या विनंतीचा सूर लक्षात आला नाहीय, तर काहींनी मात्र या विनंतीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं आहे. 

X च्या माध्यमातून झोमॅटोनं ग्राहकांना विनंती करत 'दुपारी भर उन्हाच्या वेळी, अगदीच गरज नसेल तर खाद्यपदार्थ मागवणं टाळा' असं म्हटलं आहे. देशभराता उष्णतेचा वाढता दाह पाहता ही विनंती झोमॅटोच्या वतीनं करण्यात आली असून, डिलीव्हरीसाठी बाहेर पडणाऱ्या Delivery Partner ना केंद्रस्थानी ठेवत हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. 

झोमॅटोनं केलेली ही विनंती पाहता काही युजर्सनी या विनंतीला दुजोरा दिला आहे, तर काहींनी मात्र झोमॅटोकडूनच 12 ते 4 या वेळेसाठी 'ऑनलाईन फूड डिलीव्हरी' बंद करण्यात यावी असा पर्याय सुचवला आहे. या भीषण उकाड्याच्या वेळी माणुसकी कायम प्राधान्यस्थानी असणं अपेक्षित असून, इथं झोमॅटोचा निर्णय अनेकांनी स्वागतार्ह ठरल्याचं मत नोंदवलं आहे. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : राजतिलक की करो तैयारी...  'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी? 

काहींनी झोमॅटोकडूनच कोणत्या ऑर्डर प्राधान्यस्थानी असायला हव्यात आणि कोणत्या दुय्यम हेसुद्धा ठरवलं पाहिजे असाही पर्याय सुचवलाच. एकिकडे झोमॅटोच्या निर्णयाची प्रशंसा होत असतानाच दुसरीकडे मात्र त्यांना कर्मचाऱ्यांची इतकी काळजी आहे तर, ठराविक वेळेत त्यांच्याकडूनच सेवा बंद का ठेवली जात नाही? असाही सवाल उपस्थित केला. ऑर्डर बंद करून ग्राहकांची गैरसोय करण्यऐवजी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करा, असा थेट पर्याय नेटकऱ्यांनी झोमॅटोला सुचवला आहे. तेव्हा आता या पर्यायांचा विचार करता झोमॅटो या विनंतीमध्ये बदल करत दुपारी 12 ते 4 या वेळेत डिलीव्हरी सेवा बंद ठेवतं का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.