लग्नासाठी महादेवाला नवस केला पण फळलाच नाही, तरुणाची करामत पाहून गावकऱ्यांना धक्का

Trending News In Marathi: एका तरुणाने लग्नासाठी नवस केला. मात्र तो काही पूर्ण होऊ शकला नाही. या पठ्ठ्याने केलेली करामत वाचून गावकऱ्यांनाही धक्काच बसला 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 4, 2023, 12:48 PM IST
लग्नासाठी महादेवाला नवस केला पण फळलाच नाही, तरुणाची करामत पाहून गावकऱ्यांना धक्का title=
youth stolen shivling after his marriage proposal denied

Trending News In Marathi: एका तरुणाने लग्नासाठी नवस केला. पूर्ण श्रावण महिना महादेवाची पूजा केली मात्र, इतकं करुनही लग्नासाठी मुलगी मिळाली नाही. यामुळं निराश झालेल्या तरुणाने महादेवाच्या पिंडीसोबत असं काही केलं की गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रयागराजपासून 75 किलोमीटर दूर असलेल्या कौशांबी जिल्ह्यात हा अनोखा प्रकार समोर आला आहे. 

श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची पूजा करणे व श्रावणी सोमवारी उपवास करणे शुभ मानले जाते. असं म्हणतात श्रावणातल्या सोमवारी मनोभावे भगवान शंकराची पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात. कारण या महिन्यात भगवान शंकर त्यांच्या पूर्ण परिवारासह पृथ्वीवर राहण्यासाठी येतात. याच मान्यतेनुसार एका 27 वर्षांच्या तरुणाने लग्नासाठी महादेवाकडे नवस मागितला. त्याची मनोभावे पूजा केली. तरीदेखील त्याला लग्नासाठी मुलगीच मिळाली नाही. 

छोटु असं या तरुणाचे नाव असून संपूर्ण श्रावण महिन्यात त्याने भैरो बाबा मंदिरात पूजा केली. सकाळी व संध्याकाळी मनोभावे तो रोज दर्शनासाठी व पूजा करण्यासाठी जात होता. संपूर्ण श्रावण महिना निघून गेला तरीदेखील त्याला त्याच्या पुजेचे फळ मिळाले नाही. यामुळं नाराज होत त्याने मंदिरातील महादेवाची पिंडच चोरी केली आहे. गावातील काही लोक नित्य नेमाने मंदिरात पोहोचले मात्र शिवलिंग गायब असल्याचे लक्षात येताच त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली. 

पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केल्यानंतर यात छोटूचा हात असल्याचे समोर आले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने शिवलिंगाची चोरी करुन मंदिराबाहेर लपवून ठेवल्याचे कबुल केले. पोलिसांनी शिवलिंग पुन्हा मंदिरात स्थापित केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याने शिवलिंग लपवण्यामागे त्याच्या चोरीचा उद्देश नव्हता तर त्याच्या बोलण्यावरुन तो मानसिक रुग्ण असल्याची शक्यता आहे. त्याची लग्नाची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याने हे कृत्य केले आहे. दरम्यान सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तुरुगांत पाठवले आहे. 

कुम्हियांवा येथे घडलेली ही घटना आजूबाजूच्या गावात चर्चेचा विषय ठरली आहे. तरुण छोटू यांने मंदिराच्या बाहेर गवत आणि पानाच्या मदतीने शिवलिंग लपवून ठेवले होते. या घटनेमुळं गावकऱ्यांमध्येही एकच खळबळ उडाली आहे.