संत कबीरनगर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संत कबीर यांच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी कबरीला चादर चढवली. यावेळी तिकडे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं आदित्यनाथ यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला. पण आदित्यनाथ यांनी टोपी घालायला नकार दिला. यानंतर योगींना ही टोपी हातात घेण्याची विनंती करण्यात आली. पण योगींनी यालाही नकार दिला. योगी यांनी टोपी घालायला नकार दिल्यामुळे आता राजकारण तापलं आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुस्लिम टोपी घालायला नकार दिला होता.
योगी आदित्यनाथ यांना सगळ्या टोप्या एकसारख्या दिसतात. योगींनी कबीरधामला जाण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षानं दिली आहे. तर टोपी घातल्यामुळे कोणीही मोठा किंवा छोटा होत नाही. ही एक सन्मानाची गोष्ट असते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते प्रमोद तिवारींनी दिली आहे. पण भाजपचे नेते आणि योगींच्याय मंत्रिमंडळात असलेले मोहसिन रजा यांनी योगी आदित्यनाथ यांचं समर्थन केलं आहे. मी एक मुस्लिम आहे आणि टोपी घालत नाही. जी लोकं अशावेळी वारंवार टोपी घालण्याचा आग्रह करतात त्यांनी विचार बदलण्याची गरज आहे, असं मोहसिन रजा म्हणाले.
अशाप्रकारे टोपी घातली जाऊ नये. लोकांनी आपल्या धर्माचा सन्मान करताना दुसऱ्या धर्माचाही आदर करावा, अशी प्रतिक्रिया मुस्लिम धर्मगुरू खालिद रशीद फिरंगी महली यांनी दिली आहे. संत कबीर यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य काशीमध्ये घालवलं पण शेवटचे काही दिवस ते मगहरमध्ये होते. काशीमध्ये मृत्यू झालेले स्वर्गात आणि मगहरमध्ये मृत्यू झालेले नरकात जातात अशी धारणा आहे. हा अंधविश्वास दूर करण्यासाठी कबीर मगहरमध्ये गेले.
#WATCH: UP CM Yogi Adityanath refuses to wear karakul cap offered to him at Sant Kabir's Mazar in Maghar. (27.06.2018) pic.twitter.com/MYb9Mar3WP
— ANI UP (@ANINewsUP) June 28, 2018