नवी दिल्ली - देशात रोजगार निर्मिती, रस्ते बांधणी, टाऊनशीपची उभारणी आणि औद्योगिक विकास साधण्यासाठी ज्या स्वरुपाच्या नेतृत्त्वाची गरज आहे. ते आपल्याकडे आहे, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी आपणही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे सोमवारी दाखवून दिले. त्यांनी स्पष्टपणे पंतप्रधानपदाबद्दल इच्छुक असल्याचे म्हटलेले नाही. पण त्याच्या मांडणीतून ते या पदासाठी लायक उमेदवार आहेत, हे त्यांनी सूचित केले आहे.
यशवंत सिन्हा हे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करायला सुरुवात केली. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर पुढील पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांचे नाव पुढे आले होते. जर भाजपला कमी जागा मिळाल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली होती. पण नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला २०० पेक्षा कमी जागा मिळाल्या तरी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी आपल्या पदावरून दूर होणार नाहीत. त्यामुळे नितीन गडकरी पंतप्रधान होणार नाहीत, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.
यशवंत सिन्हा म्हणाले, सध्या रोजगाराची निर्मिती आणि रस्तेबांधणी वेगाने होत नाही, हे देशासमोरील दोन मोठे प्रश्न आहेत. शेती व्यवसाय फायद्यात आणू शकेल, अशा नेत्याची देशाला गरज आहे. त्याच्याकडून सिंचनाचे प्रकल्प वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्याने औद्योगिक विकासासोबत टाऊनशिपच्या निर्मितीकडेही लक्ष दिले पाहिजे.
देशात अजून बऱ्याच गोष्टी करणे बाकी आहे. जो कोणी वर सांगितलेल्या मार्गावरून चालून काम करायला सुरुवात करेल, अशा नेत्याची देशाला गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावर तुमच्या मनात असा कोणी नेता आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर मी स्वतः हे सगळे करू शकतो, असे उत्तर त्यांनी दिले. त्यांच्या उत्तरामुळे सभागृहात काहीवेळ हशा पिकला.