कल्याण स्थानकावरील लोकग्राम पादचारी पुलाचे पाडकाम लवकरच होणार सुरू

जुना पूल येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येणार आहे.

Updated: Dec 4, 2020, 06:45 PM IST
कल्याण स्थानकावरील लोकग्राम पादचारी पुलाचे पाडकाम लवकरच होणार सुरू title=

आतिष भोईर, कल्याण : कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाच्या कामाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गती आली असून अस्तित्वातील जुना पूल येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येऊन लगेचच नव्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. जुना पुल पाडण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून हे काम सुरू असतानाच नव्या पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सूचना मध्य रेल्वेने मान्य केली आहे.

मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसमवेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली.

लोकग्राम पुलाच्या पाडकामाला लवकरच सुरुवात होऊन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. हे पाडकाम सुरू असतानाच नव्या पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवा, जेणेकरून पाडकाम पूर्ण होताच नव्या बांधकामाला सुरुवात करता येईल, ही आपली सूचना रेल्वेने मान्य केली असून या पुलासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे लवकरच रेल्वेकडे ७८ कोटी रुपये जमा केले जातील, असेही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.