Woman Alleges Sexual Assault While Enjoying Rain: नोएडामधील सेक्टर 48 मध्ये एका महिलेची काही तरुणांनी छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याहून आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेण्याऐवजी पीडित महिलेलाचा धमकावल्याचा दावा केला जात आहे. सदर तरुणीनेच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली आहे. त्यांनी या प्रकरणामध्ये सोशल मीडियावरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
सोशल मीडियावर या तरुणीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिने, "सेक्टर 48 मध्ये माझी छेड काढण्यात आली," असं म्हटलं आहे. संपूर्ण घटनाक्रम सांगताना या तरुणीने, "मी माझ्या घराबाहेर पावसात भिजण्याचा आनंद घेत असतानाच एक तरुण आला आणि त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकाने माझी शॉर्ट्स फाडली. त्यानंतर तो पुढे काही करणार इतक्यात दोन तरुणी माझ्या मदतीला आल्याने तो तिथून पळून गेला," असं सांगितलं. "हा सारा प्रकार मला घाबरुन टाकणारा होता. नेमकं काय घडतंय हे मला कळत नव्हतं. मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता त्यांनी मला काहीही मदत केली नाही. त्यांच्याकडे इतर महत्त्वाची प्रकरणं होती म्हणून त्यांनी माझी तक्रारही नोंदवून घेतली नाही. त्यांनी एफआयआरही घेतली नाही. त्यांनी अप्रत्यक्षपणे असं सांगितलं की सायंकाळी साडेसात वाजता पावसात भिजायला जाणं हा माझा दोष आहे. सायंकाळी साडेसातला पावसात भिजायला जाण्याची काय गरज आहे? मात्र साडेसात वाजता आजूबाजूला लोकं असताना हे सारं घडलं," असं या तरुणीने सांगितलं.
"आम्ही सीसीटीव्ही तपासण्यास सांगितलं असता कोणाकडेही पासवर्ड नसल्याचं लक्षात आलं. ही गेटेड कम्युनिटी आहे त्यामुळे इथे अधिक सुरक्षित वातावरण हवं. पण येथील बरेचसे कॅमेरा कामच करत नाहीयेत. तसेच काही कॅमेरांना वीजपुरवठाच नाही तर कोणतेही फुटेज सापडले नाहीत. त्यांना असलेली फुटेजही हाताळता येत नाहीत. हा व्हिडीओ बनवण्याचं कारणं म्हणजे सुरक्षित राहा, सावधान राहा एवढं सांगणं आहे," असं या तरुणीने म्हटलं आहे.
दरम्यान, या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नोएडामधील गौतम बुद्ध नगर पोलीस स्टेशनच्या एक्स अकाऊंटवरुन, या प्रकरणामध्ये आजच 3 ऑगस्ट रोजी सेक्टर 49 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली. वेगवेगळ्या कलमांअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले जात असून आजच कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
— POLICE COMMISSIONERATE GAUTAM BUDDH NAGAR (@noidapolice) August 3, 2024
मात्र या साऱ्या प्रकरणामुळे दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.