नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात परतलेले विंग कमांडर अभिनंदन यांची संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि भारतीय वायुदल प्रमुख बी. एस. धनुआ यांनी आज भेट घेतली. पाकिस्तानात नेमके काय घडले, याबाबतची सविस्तर माहिती अभिनंदन यांनी यावेळी संरक्षणमंत्री आणि वायुदलप्रमुखांना दिली. दरम्यान, आज सकाळी नवी दिल्लीतील लष्करी मुख्यालयात अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
पाकिस्तानच्या ताब्यात ६० तास असलेल्या अभिनंदन यांची वैद्यकीय आणि मनोवैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. तूर्तास त्यांचा मुक्काम वायुदल अधिकाऱ्यांच्या मेसमध्येच असणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या तावडीतून भारतात परतलेले अभिनंदन यांच्या शौर्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जोरदार कौतुक केले आहे. अभिनंदन या शब्दाचा शब्दकोशातला अर्थच आता बदलून गेला आहे. शब्दांचे अर्थ बदलण्याची ताकद भारतामध्ये आहे, असे गौरवोद्गार मोदींनी विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले.